
सावंतवाडी : येथील अस्मसा आर्ट अॅकॅडमीमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे ओरोस येथील विलास बाळकृष्ण तवटे याने सीईटी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विलास बाळकृष्ण तवटे (ओरोस), यश बाबुराव सातारडेकर (वेंगुर्ले), यश मिलेश धुरी (सावंतवाडी), कश्मीरा राजेश तायशेटे (ओरोस), सुकन्या राणे (कणकवली) आणि नूतन प्रवीण मुळीक (वेंगुर्ला) यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून अस्मसा आर्ट अॅकॅडमीमध्ये चित्रकलेचे प्रशिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांना चित्रकार सत्यम मल्हार, अक्षय सावंत आणि प्राची सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. अॅकॅडमीतील विद्यार्थ्यांनी केवळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्येच नव्हे, तर बांदेकर फाइन आर्ट स्कूल, रचना संसद आणि मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट यांसारख्या नामांकित कला संस्थांमध्येही प्रवेश मिळविला आहे.
अॅकॅडमीच्या शिक्षकवर्गाचीही शैक्षणिक पार्श्वभूमी उल्लेखनीय आहे. चित्रकार सत्यम मल्हार यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून बीएफए आणि एमएफए या पदव्या प्राप्त केल्या आहेत. अक्षय सावंत यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून बीएफए पदवी घेतली आहे, तर प्राची सावंत यांनी ठाणे स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे.
सावंतवाडीतील अस्मसा आर्ट अॅकॅडमीमध्ये सध्या २०० हून अधिक विद्यार्थी चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार कला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांना राज्यातील नामांकित कला संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात अॅकॅडमीचे योगदान ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कला क्षेत्रातून तसेच पालक आणि नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.











