
सावंतवाडी : चौकुळ गावातील मऱ्हाटवाडी-बेरडकी येथे राहणाऱ्या बेरड समाजातील कुटुंबांवर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे संकट ओढवले होते. अनेक घरांची छपरे उडून गेली, तर तीन घरांचे पूर्णतः नुकसान झाले. या आपत्तीच्या काळात स्थानिक आमदार दीपक केसरकर आणि महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आपद्ग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे. या पाहणीदरम्यान एका मोठ्या समस्येवर तोडगा काढत, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या दुर्लक्षित समाजातील ३७ कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीचे 'मालमत्ता पत्रक' वाटप करण्यात आले.
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार दीपक केसरकर आणि तहसीलदार श्रीधर पाटील प्रशासकीय यंत्रणेसह चौकुळ मऱ्हाटी बेरडकी येथे पोहोचले. पाहणीदरम्यान ही ३७ कुटुंबे वर्षानुवर्षे गावठाण जमिनीवर घरे बांधून राहत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, या जमिनी त्यांच्या अधिकृत नावावर नव्हत्या. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करताना मोठा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला होता.
ही गंभीर बाब लक्षात येताच आमदार दीपक केसरकर यांनी प्रशासनाला जलदगतीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे आणि प्रांताधिकारी विरसिंग वसावे यांच्याशी चर्चा करून तातडीने जमिनीचे रेकॉर्ड तयार करण्याचे आदेश दिले. महसूल विभागाने अत्यंत वेगाने चक्रे फिरवून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व ३७ कुटुंबांची मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) तयार केली. तयार करण्यात आलेली मालमत्ता पत्रके बाधित कुटुंबांना सुपूर्द करण्यात आली. यामुळे गेल्या अनेक दशकांपासून जमिनीच्या हक्कापासून वंचित असलेल्या या समाजाची घरे अधिकृतपणे सरकारी अभिलेखावर आली आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वतःच्या जागेचा अधिकृत पुरावा हातात मिळाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच, पावसामुळे ज्या तीन घरांचे पूर्णतः नुकसान झाले होते, त्या प्रत्येक कुटुंबाला १ लाख २० हजार रुपये आणि इतर अंशतः नुकसान झालेल्या बाधितांना प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून या दुर्लक्षित घटकाला प्रशासकीय दाखले आणि मदतीचा थेट लाभ मिळाला. या दाखले व मदत वाटप कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील , भूमि अभिलेख उपअधीक्षक विनायक ठाकरे,वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांच्यासह इतर अनेक शासकीय अधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.










