LIVE UPDATES

सावंतवाडीत शिवसेनेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

करिअर निवडताना पालकांनी मुलांच्या कलाने घ्यावे : संजू परब
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 18:30 PM
views 30  views

सावंतवाडी : सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी विविध पातळ्यांवर शैक्षणिक उपक्रम हाती घेतले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसारच आपले करिअर निवडावे. पालकांनी आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती साधताना किंवा विशिष्ट क्षेत्र निवडताना कोणताही हट्ट धरू नये. आजच्या घडीला करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर तुमच्याकडे कौशल्य असणे अनिवार्य आहे. कारण, कौशल्य असेल तरच तुम्ही या स्पर्धेत टिकून राहाल, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. 

सावंतवाडी तालुका शिवसेना आयोजित आणि आमदार दीपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री. परब बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा ॲड. सौ. नीता कविटकर, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, परीक्षित मांजरेकर, नगरसेविका स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, भारती मोरे, नगरसेवक अजय गोंदावळे, गुरू मठकर, आबा केसरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख परब म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू देणे गरजेचे आहे. आज अनेक नवनवीन क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. शैक्षणिक वाटचालीत निव्वळ टक्केवारीपेक्षा स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी समाजातील लोकांचे चांगले अनुभव घ्यावेत आणि प्रत्येक क्षेत्रातील माहिती घेऊन त्यात आवड निर्माण करावी. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ॲड. नीता कविटकर यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे, असे सांगितले. तर शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाटा सोडून विविध क्षेत्रांतील नव्या संधी शोधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमा दरम्यान पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि तालुका प्रमुख दिनेश गावडे आदि मान्यवरांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले. या गुणगौरव सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.