
देवगड : देवगड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जामसंडे व वाडा येथे दोन घरांचे नुकसान झाले. जामसंडे पाटकरवाडी येथील सखाराम कावले यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळून पडवी व घराचे नुकसान झाले. या दुर्घटनेत त्यांची पत्नी सुनंदा कावले या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी देवगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा सविस्तर पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात येणार आहे.
तसेच, मौजे वाडा येथे अतिवृष्टीमुळे अरुणा नरहर आचरेकर यांच्या घराचेही नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, नुकसानीची पंचयादी लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी यांनी दिली.












