LIVE UPDATES

वनविभागाच्या कारवाईतील संशयीतांची जामीनावर मुक्तता

Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 20, 2026 20:30 PM
views 21  views

सावंतवाडी : आंबोली-दोडामार्ग राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीर शिकार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळ्यांवर वनविभागाने दोन वेगवेगळ्या कारवाया करून संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक केली होती. आरोपींकडून गावठी ठासणीची बंदूक, काडतूस बंदूक, जिवंत व वापरलेली काडतुसे, तलवार, विजेऱ्या, एक आलिशान एमजी हेक्टर गाडी आणि शिकार केलेले दुर्मिळ वन्यजीव जप्त करण्यात आले होते. या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींची वन कोठडीची मुदत संपल्यामुळे  त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली आहे.

यातील पहिली कारवाई मासुरु येथील शासकीय जंगलात झाली होती. वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या परिशिष्ट-१ अन्वये सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या साळींदर या वन्यजीवाची शिकार करून घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली. रात्रीच्या अंधारात विजेरीच्या प्रकाशात शिकारीसाठी फिरणाऱ्या विठू वाघू कोकरे (वय ४५, रा. चुरणीचीमुस चौकुळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला वनविभागाच्या पथकाने सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून जंगलात रंगेहात ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून एक गावठी ठासणीची बंदूक, मृत साळिंदर, हेड टॉर्च आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला होता. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी १७ जून रोजी ही कारवाई करण्यात आली होती.  या केसमध्ये आरोपीच्यावतीने ॲड. परिमल नाईक, ॲड. सुशील राजगे, ॲड. अमिषा बांदेकर व ॲड. रश्मी नाईक यांनी काम पाहिले.

 दुसऱ्या कारवाईत मौजे नेने वन कक्ष क्रमांक १८१ मधील शिरगांवकर पॉईंट येथे वनविभागाला दुसरी टोळी पकडण्यात यश आले होते. पहाटेच्या सुमारास जंगलात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमांचा पाठलाग करून त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे १ नळी काडतूस बंदूक, ७ जिवंत काडतुसे, १० वापरलेली काडतुसे, तलवार आणि शिकार केलेले मृत गेळा/पिसोरी (माऊस डीयर) व १ कटीदर/फटकुरा (एशियन पाम सिव्हेट) हे वन्यजीव आढळून आले होते. या दुसऱ्या कारवाईदरम्यान पवन प्रकाश देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), जावेद सलीम जमादार (रा. यादव नगर मेन रोड, कोल्हापूर), हसीम हुसेन काजी (रा. तिरवडे कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), भरत नवलू पाटील (रा. चौकुळ, जळववाडी नेने, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), वनु विठ्ठल फोंडे (रा. एरंडपे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), गणेश तुकाराम पाटकर (रा. पिंपरी चिंचवड, नवी सांगवी, पुणे) आणि आकाश मोहन कुरणे (रा. यादव नगर, कोल्हापूर, जि. कोल्हापूर) या संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले होते. त्याचवेळी या शिकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर येथून आलेली आलिशान एमजी हेक्टर गाडी (क्रमांक MH09GF 0014) वनविभागाच्या पथकाला आढळून आली होती. पथकाने तत्परता दाखवत गाडीतील सोबत्यांसह शिकार करणाऱ्या इतर आरोपींना वाहनासह घटनास्थळावरच अटकाव करून ताब्यात घेतले होते. या कारवाई दरम्यान लक्ष्मण नवलू पाटील (वय ३६, रा. चौकुळ, नेनेवाडी) व संदीप जनार्दन यमकर (वय २७, रा. सांगेली) हे दोघे फरार झाले होते. मात्र, वन विभागाच्या पथकाने नंतर या दोघांनाही ताब्यात घेतले.

एकूण ९ संशयित आरोपी असलेल्या या दुसऱ्या पिसई शिकारीच्या केसमध्ये सर्व आरोपींच्या वतीने ॲड. परिमल नाईक, ॲड. सचिन सावंत आणि ॲड. राहुल पै यांनी न्यायालयात काम पाहिले. फरार असलेल्या दोन्ही आरोपींसह या दुसऱ्या केस मधील सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची देखील न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.