LIVE UPDATES

स्मार्ट मीटरला तीव्र विरोध

दादागिरी केल्यास फटके देऊ | सुभाष दळवी आक्रमक
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 20, 2026 20:47 PM
views 83  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला वीज ग्राहक संघटनेने तीव्र विरोध दर्शविला असून, ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची दादागिरी अथवा जबरदस्ती केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा आक्रमक इशारा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी यांनी दिला. पत्रकार परिषदेमार्फत दिला आहे.

आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलताना म्हणाले की, स्मार्ट मीटरबाबत अनेक शंका व तक्रारी असून, त्या दूर न करता ग्राहकांवर मीटर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारची दादागिरी वीज ग्राहक संघटना कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. ग्राहकांनीही आता एकजूट दाखवत आपल्या हक्कांसाठी पुढे यावे, कोणीही स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आले तर त्यांना विरोध करा आणि वीज ग्राहक संघटना दोडामार्ग ला संपर्क करा. असे आवाहन त्यांनी केले. २७ जून रोजी मांगेली येथे तालुक्याच्या गेल्या २७ वर्षांतील वीज समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध गावांतील प्रलंबित प्रश्न, वीज पुरवठ्यातील अडचणी तसेच भविष्यातील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज ग्राहक संघटनेचे सचिव भूषण सावंत यांनी सांगितले की, प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, यासंदर्भात लवकरच गोव्याचे वीजमंत्री यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे. सीमाभागातील वीज ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा मिळावी, यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वीज ग्राहकांनी उदासीन न राहता संघटनेच्या आंदोलनात सहभागी व्हावे, अन्यथा भविष्यातील निर्णयांचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच बसू शकतो, असा इशाराही देण्यात आला.यावेळी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, आशीर्वाद मणेरीकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.