
सावंतवाडी : उच्च न्यायालयाचे वृक्षतोड बंदीचे आदेश लागू असताना दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात होत असलेली बेसुमार वृक्षतोडीबाबत सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोड बंदीचे आदेश लागू आहेत. संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील १३ गावे या क्षेत्रात कडक वृक्षतोड बंदीचे आदेश दिलेले आहेत असं त्यांनी म्हटल आहे.
यासर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एका टास्क फोर्स समिती नेमण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. असे असतानाही गेल्या वर्षभरात दोडामार्ग तालुक्यातील सासोली,पाट्ये, मोर्ले या गावांमध्ये तसेच सावंतवाडी तालुक्यातील सरमळे,कोलझर,फुकेरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे. हजारो वृक्षांची अशारीतीने वृक्षतोड होत असेल तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा तो अवमान आहे. सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील हा पट्टा वन्यजीवांचा वाईल्ड लाईफ काॅरिडाॅर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यावर हे वन्यजीव त्यांचा अधिवास संपुष्टात आल्यामुळे नागरी वस्तीत,शेती, बागायतींमध्ये येत आहेत.
काही शेतकऱ्यांचे हत्ती,गवे रेडे यांच्या हल्ल्यांमुळे गतकाळात दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत. एके ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे असा दुहेरी कार्यक्रम आपल्या जिल्ह्यातील संपन्न वनसंपदेसाठी आणि जैवविविधतेसाठी धोकादायक आहे. या बाबींची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे










