
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामध्ये कार्यरत असलेल्या तालुका समन्वयक ८ व समूह समन्वयक १६ अशा एकूण २४ कर्मचाऱ्यांचे गेले सहा महिन्यांपासून वेतन रखडले असून त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. गेली तेरा वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांसमोर आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती वाटून देण्यात आलेल्या आहेत. त्या ग्रामपंचायतींमध्ये जाऊन शौचालय, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या स्वच्छता उपक्रमांबाबत जनजागृती करणे, ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे, विविध योजनांची माहिती देणे तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी केलेल्या कामांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणे, अशी महत्त्वाची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर आहे.
स्वच्छता व आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी हे कर्मचारी सातत्याने गावागावात जाऊन काम करत आहेत. मात्र, इतकी महत्त्वाची जबाबदारी पार पाडूनही त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, आजारपणाचा खर्च तसेच इतर दैनंदिन गरजा भागवताना त्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.
विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांनी गेली तेरा वर्षे सातत्याने सेवा दिलेली असून आता त्यांची वयोमर्यादाही वाढलेली आहे. त्यामुळे त्यांना दुसरीकडे नोकरी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून शासनाने तातडीने त्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.










