LIVE UPDATES

दोडामार्ग तहसीलदार, पोलिस निरीक्षकांच्या संगनमतानेच आडाळीतील प्रकार

दोघांची नार्को टेस्ट करा : संजू परब
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 29, 2026 14:39 PM
views 170  views

सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात राजरोसपणे उत्खनन होत असून या प्लॉट मधील हजारो हेक्टर क्षेत्रातील खनिज सदृश्य माती चोरीस गेली आहे. दोडामार्ग तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून त्यांची ही टोळी आहे. या प्रकाराला हेच प्रशासनाचे अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप करत दोडामार्ग तहसीलदार व पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

परब म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील एमआयडीसी प्लॉटिंग मध्ये खनिज सदृश्य मातीचे उत्खनन सुरू आहे. गेली महिनाभर या मातीची चोरी होत आहे. तरी कोणतीही कारवाई पोलीस व महसूल प्रशासनाकडून झालेली नाही. या अवैध माती उत्खनन व चोरी प्रकरणात दोडामार्ग तहसीलदार व पोलीस निरीक्षक गुंतलेले आहेत. त्यामुळेच हे करणे शक्य झाले असा आरोप केला. तर हा प्रकार सुरू असताना प्रशासन काय करत होते ? हा मोठा प्रश्न असून इतरवेळी घरांसाठी वाळू काढताना गरीब ग्रामस्थांवर हेच महसूल प्रशासन दीड दीड लाख रुपयांचा दंड करते. आता एवढी खुलेआम चोरी तसेच उत्खनन सुरू असताना महसूल, पोलीस प्रशासनाचा लक्ष नाही याचे आश्चर्य आहे. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केला असून स्थानिक ग्रामस्थ, शिवसेनेने आवाज उठवून देखील तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. अथवा, कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराला तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनाच जबाबदार धरून त्यांची नार्को टेस्ट करा सर्व सत्य बाहेर येईल अशी मागणी संजू परब यांनी केली. या प्रकरणाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या दहा दिवसात प्रशासनाने संबधीतावर कारवाई न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा जिल्हाप्रमुख श्री. परब यांनी दिला. 

तर हा प्रकार आमच्या तालुका प्रमुख यांनीच उघडकीस आणला आहे. स्थानिक ग्रामस्थ यांनी प्रशासनाला ही बाब निदर्शनास आणून दिली होती. एमआयडीसी हा शासनाचा प्रकल्प असून त्या जागेत विनापरवाना खोदाई करणे माती वाहतूक करणे हे गैर आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची माहिती मागविली आहे. ती आल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती श्री. परब यांनी दिली. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते.