
सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा ३८ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी माजगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "जनकल्याणाचा वारसा जपताना आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल असे पहा," असा वडिलकीचा आशिर्वाद यावेळी त्यांनी विक्रांत सावंत यांना दिला.
माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत, कै. विकास सावंत आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यातील कौटुंबिक स्नेहसंबंधांची परंपरा कायम राखत, प्रवीण भोसले यांनी सावंत यांच्या माजगाव येथील घरी जात सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी भोसले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सावंत यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक प्रवासाला शुभेच्छा दिल्या. विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी माजगाव येथील सदिच्छा भेटीदरम्यान आर. के. सावंत, संजय कानसे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार शिवराम दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या सह लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून गुरुवारी दिवसभर विक्रांत सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.










