
सावंतवाडी : जनगणनेचे काम करत असताना प्रगणकांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचल्याची घटना वार्ड क्रमांक १९, सर्कल क्रमांक ३, ब्लॉक क्रमांक १५ येथे घडली. घराचा दरवाजा ठोठावून व आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. यातच प्रगणकांना घरातील लाईट व पंखे सुरू असल्याचे दिसून आले. संशय आल्याने त्यांनी घरात डोकावून पाहिले असता वृद्ध आजोबा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसले व त्यांच्या शेजारी आजीही बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या. वृद्धाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास झाले. तर जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला.
जनगणनेचे काम सुरू असताना ब्लॉक क्रमांक १५ च्या प्रगणक श्रीमती वैशाली प्रशांत नालसे या आपल्या कार्यासाठी संबंधित घरात पोहोचल्या. त्यांच्यासोबत प्रगणक मनोज नेताजी वाकोडे तसेच सुपरवायझर केशव नरेंद्र पंचारिया हेही उपस्थित होते. घराचा दरवाजा ठोठावून व आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्या घरात वृद्ध आजी-आजोबा दोघेच राहत असून आजोबांची तब्येत नेहमीच खराब असते व आजी रोज सकाळी फिरायला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुरुवातीला ते बाहेर गेले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मात्र, प्रगणकांना घरातील लाईट व पंखे सुरू असल्याचे दिसून आले. संशय आल्याने त्यांनी घरात डोकावून पाहिले असता वृद्ध आजोबा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यांच्या शेजारी आजीही बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या, घरातून दुर्गंधीही येत होती. यावेळी प्रगणकांनी तत्काळ शेजाऱ्यांना बोलावून घेतले तसेच जवळ राहणाऱ्या डॉक्टरांनाही घटनास्थळी पाचारण केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता आजोबांचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पाहून वृद्ध आजी बेशुद्ध पडल्या होत्या.
त्यानंतर संबंधित महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, महिलेची ऑक्सिजन लेव्हल व शरीरातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली होती. थोडा जरी उशीर झाला असता तर त्यांचाही मृत्यू झाला असता, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, संबंधित वृद्ध दाम्पत्याचा एक मुलगा परदेशात राहतो. तर दुसरा नागपुरात वास्तव्यास आहे. या घटनेची माहिती दोन्ही मुलांना देण्यात आली. तसेच मृत वृद्धाच्या पार्थिवावर आज सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कता, तत्परता आणि मानवतेच्या भावनेमुळे एका महिलेचा जीव वाचल्याने परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.












