LIVE UPDATES

ग्रामीण भागात गोतस्कर टोळ्या सक्रिय होण्याची शक्यता

बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपनावरांचे सतर्कतेचे आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 23, 2026 21:16 PM
views 15  views

सावंतवाडी : ग्रामीण भागात गोतस्कर टोळ्या सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेऊन बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपनावर यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. २ पैसे जास्त मिळतात म्हणून कोणत्याही आमिषाला बळी पडून आपला गोवंश कत्तलीसाठी विकू नका, अशी श विनंती त्यांनी शेतकरी बांधवांना केली आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. या अंतर्गत गाय, वासरू, बैल आणि खोंड यांची हत्या करणे, कत्तलीसाठी त्यांची विक्री करणे किंवा वाहतूक करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. २०१५ च्या सुधारित कायद्यानुसार या गुन्ह्यासाठी ५ वर्षांपर्यंत कैद आणि १० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. जर तुमचा बैल किंवा गोवंश कत्तलीसाठी जाताना पकडला गेला, तर पोलीस केवळ गाडीच्या ड्रायव्हरवर नाही, तर तो प्राणी विकणाऱ्या मूळ शेतकऱ्यावरही गुन्हा दाखल करतात. त्यामुळे पोलीस स्थानक, कोर्ट आणि वकिलांच्या फेऱ्यात अडकण्याची शेतकऱ्यांवर वेळ येऊ शकते. आज मिळणारे ५ हजार जास्त वाटतील, पण उद्या मोठा भुर्दंड बसेल, असा इशारा श्री. धुळपनावर यांनी दिला आहे. महाराष्ट्र सरकारने गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांविरोधात कठोर पावले उचलली असून आता अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

तसेच गोवंश विकायचाच असेल तर तो केवळ शेतीकामासाठी किंवा दुधासाठीच विकावा, खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडून "हा गोवंश कत्तलीसाठी नेणार नाही," असे लेखी लिहून घ्यावे. गावात कोणतीही अनोळखी गाडी किंवा संशयास्पद व्यापारी फिरताना दिसल्यास तात्काळ ११२ नंबरवर पोलिसांना किंवा स्थानिक गोरक्षकांना माहिती द्यावी. आमचा कोणत्याही सणाला विरोध नाही. मात्र, कायद्याचे उल्लंघन करून आणि गोमातेची हत्या करून जर सण साजरा होणार असेल, तर गोरक्षक म्हणून आम्ही शांत बसणार नाही. आम्ही कायदा हातात न घेता, प्रशासनाला सर्व माहिती देऊन गोतस्करांवर कडक कायदेशीर कारवाई करायला भाग पाडू असंही त्यांनी सांगितल.