
महसूल यंत्रणेला - खनीकर्मला दिसत नाहीत प्रताप ?
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसीच्या माध्यमातून बेकार युवक-युवतीना रोजगार मिळावा तालुक्याचा उद्योग धंद्यातून विकास व्हावा म्हणून आडाळी एमआयडीसी उभारण्यात आली. मात्र, या एमआयडीसीच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्याचा विकास झाला नाही तर अवैध खनीज युक्त माती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचा विकास नक्कीच झाला. आडाळी एमआयडीसीतील जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली रात्रीस खेळ करणारा 'पुष्पा' कोण ? हे इथल्या महसूल यंत्रणेला व खनीकर्म विभागाला दिसत नाही की या मागच कारण अजून काही आहे ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
आडाळी एमआयडीसी उद्योगधंदे उभे रहावे, गोवा राज्यावर अवलंबून असलेल्या इथल्या स्थानिक युवक युवतींना तालुक्यातच रोजगार मिळावा, या उद्देशाने एमआयडीसी प्रकल्प उभा केला. मात्र, कित्तेक वर्षे हा प्रकल्प उद्योगधंद्यापासून धुळखात पडला आहे. याचा फायदा तालुक्यातील व तालुक्या बाहेरील खनिज तस्करी करणाऱ्यांना झाला आहे. असं म्हटलं जातं की "जे दोडामार्गच्या जमिनीत मिळत ते अजून कुठं मिळत नाही " याचाचा फायदा घेत अनेक तस्कर कोट्यावधी रुपये कमवून मालामाल झाले आहेत. हे सर्व करण्यासाठी प्रशासनाचा देखील छुपा हात असल्याचे बोलले जात आहे. आडाळी एमआयडीसीत उत्खनन नव्हे तर उद्योग येण आवश्यक आहे. गोवा राज्य, मोपा विमानतळ सीमेवर असल्याने रोजगाराची खाण म्हणून आडाळीचे नाव निर्माण होणे अपेक्षित आहे. मात्र, इथे सुरू असणारे हे प्रकार बघता लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाकडून याची दखल घेत तात्काळ योग्य ती कार्यवाही होण अपेक्षित आहे.










