LIVE UPDATES

माणगाव श्री दत्तमंदिरात 'स्तोत्रसखी परिवार'चा संगीतमय कार्यक्रम

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 23, 2026 21:32 PM
views 26  views

माणगाव: अधिकमास सेवेचे औचित्य साधून स्तोत्रसखी परिवार, सावंतवाडी यांच्यावतीने देवीदेवतांच्या स्तोत्रांवर आधारित असलेल्या एका आगळ्यावेगळ्या भक्तीपूर्ण आणि संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १९ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० ते ६:०० या वेळेत श्री दत्तमंदिर, माणगाव येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. 'स्तोत्रसखी परिवार'चे हे ११वे यशस्वी सादरीकरण होते.

सौ. भाग्यश्री कशाळीकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव कार्यक्रम साकारला आहे. या कार्यक्रमात त्यांनी स्वतः तसेच सौ. सुवर्णा प्रभुदेसाई, सौ. स्वाती गगनग्रास, सौ. हर्षा भांगले, सौ. सोनिया सामंत आणि डॉ. सौ. मीना जोशी यांनी आपल्या अवीट व मधुर सुरांनी देवीदेवतांची स्तोत्रे सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. सौ. मीना उकिडवे यांनी प्रास्ताविक, निवेदन, सूत्रसंचालन आणि सहगायिका अशा सर्वच भूमिका अत्यंत लीलया आणि प्रभावीपणे पार पाडल्या. गायिकांच्या या भक्तीमय सादरीकरणाला चंद्रकांत घाटे यांनी संवादिनीवर (हार्मोनिअम) तर कु. अक्षय सरवणकर याने तबल्यावर उत्तम साथसंगत करून कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  भालचंद्र (आबा ) कशाळीकर,  रवींद्र गगनग्रास, नंदकुमार प्रभुदेसाई यांच्यासह पुणे येथील  विनायक आठलेकर आणि त्यांच्या परिवाराने विशेष परिश्रम घेतले. हा आगळावेगळा आणि मन प्रसन्न करणारा कार्यक्रम ऐकायला मिळाल्याची भावना उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केली. तसेच या उपक्रमाचे लवकरच २५वे सादरीकरण व्हावे, अशा मनमोकळ्या शुभेच्छाही त्यांनी या परिवाराला दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी दत्तमंदिर समितीच्या वतीने उपस्थित सर्व कलाकारांना श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.