'लोक-सिंधु' महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल : दीपक केसरकर

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 15, 2026 14:54 PM
views 45  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येत असताना, इथली संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा 'लोक-सिंधु' महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य समूहाने स्थानिकांना संधी देण्याचे मोलाचे कार्य केले असून हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जावा, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. मळगाव-सावंतवाडी येथे आयोजित तीन दिवसीय 'लोक-सिंधु' महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. 

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १३ मार्चपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी  केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात आता पंचतारांकित हॉटेल्स उभी राहत आहेत. अशा काळात केवळ पायाभूत सुविधा असून चालत नाही. तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक कला आणि संस्कृतीची जोड आवश्यक असते. लोकमान्य सोसायटीने विविध संस्थांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या आणि कलेच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. 

या महोत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक पंढरी परब यांच्या हस्ते आमदार दीपक केसरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचाही श्री. केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, अजित मसुरकर, ऋतुजा मोरे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संचालक पंढरी परब,  ज्येष्ठ संचालक गजानन धामणेकर, ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, प्रतिभा दडकर, तन्वी वेलांगी, अनिरूद्ध दास, प्रवीण प्रभू केळूसकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केल. 

औपचारिक कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रुप डान्स स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असूनही, परिसरातील रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.