LIVE UPDATES

शासकीय कार्यालयात अधिकाऱ्याच्या 'मेहुण्या'चा हस्तक्षेप ?

कामकाजासाठी पैसे घेत असल्याचा आरोप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 15:02 PM
views 39  views

  • प्रशासन योग्य 'पाहुणचार' करणार ? 
  • नागरिकांत नाराजी 

दोडामार्ग : एका महत्त्वाच्या शासकीय विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चक्का आपल्या मेहुण्याला कार्यालयीन कामकाजात सहभागी करून घेतल्याची चर्चा सध्या तालुक्यात जोरदार सुरू आहे. संबंधित व्यक्ती कोणत्याही शासकीय पदावर नसतानाही त्याचा कार्यालयात नियमित वावर व कामकाजासाठी पैसे घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

       संबंधित अधिकाऱ्याचा मेहुणा कार्यालयातील काही शासकीय दप्तर आणि कागदपत्रांची हाताळणी करत असल्याचे सांगितले जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रे असतात. त्यामुळे अशा संवेदनशील दस्तावेजांपर्यंत अनधिकृत व्यक्तीची पोहोच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चिंता वाढवणारी ठरत आहे. याशिवाय, विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून संबंधित व्यक्तीमार्फत पैशांची मागणी केली जात असल्याच्याही चर्चा सुरू आहेत.

काही नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त केली जात आहे की, कार्यालयातील काम लवकर मार्गी लावण्यासाठी प्रथम या व्यक्तीशी संपर्क साधावा लागतो. त्यानंतरच संबंधित कामाला गती मिळते, असे बोलले जात आहे. या सर्व प्रकारामुळे कार्यालयातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकृत जबाबदारी नसलेल्या व्यक्तीचा कार्यालयीन व्यवहारांमध्ये हस्तक्षेप होत असेल, तर त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाणार का? तसेच चर्चेत असलेल्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी चौकशी केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर काय कारवाई होणार? याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.