सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे : संदेश पारकर

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा मेळावा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 22, 2026 19:35 PM
views 20  views

कणकवली : सर्वसामान्य माणूस हा जागतिकीकरण व भांडवलशाहीमध्ये उद्‌ध्वस्त होत आहे. जागतिकीकरणाने बारा बलुतेदारांचे पारंपरिक व्यवसाय उद्‌ध्वस्त केले आहेत. या कारागीर व सर्वसामान्य माणसाला विकासाच्या वाटेवर आणून त्याला विकासाचा केंद्रबिंदू केला पाहिजे तरच सर्वसामान्य माणूस या जागतिकीकरणामध्ये टिकाव धरू शकेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथे महात्मा फुले मा. वि. महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग, चर्मकार विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग सीओसीओ आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. याचे उद्‌घाटन संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कणकवली नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अधम, महात्मा फुल महामंडळाच्या वर्षा कासले, लिपिक सिद्धेश सावंत, नगरसेवक लुकेश कांबळे, समतादूत अ‍ॅड. सुदीप उर्फ भाई कांबळे, संजय कांबळे, भाई जाधव, विष्णू सकट, प्रतीक्षा कांबळे, राजेश कदम, धर्मचद्र हिंदळेकर आदी उपस्थित होते. वर्षा कासले यांनी तिन्ही महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी लाभार्थ्यांना अर्जांचे वाटप करण्यात आले. सफाई कामगारांच्या योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्यासाठी सफाई‌ कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन अमोल अघम यांनी दिले. लाभार्थ्यांना शासकीय अडचणींमध्ये मदत करण्याचे आश्वासन सुदीप कांबळे यांनी दिले.