
सावंतवाडी : शहरातून चोरीला गेलेली सुझुकी एक्सेस दुचाकी शोधण्यात सावंतवाडी पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
फिर्यादी आदित्य गोविंद खोरजूवेकर (वय १९, रा. माझगाव खोतवाडा) यांची सुझुकी एक्सेस गाडी (क्रमांक MH 07 AW 1048) ही दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:४५ च्या दरम्यान त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतून चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेल्याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मनोज राऊत करत असतानाच, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब यांना गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रवी शंकर लाखे (वय ४०, रा. लाखेवस्ती, सावंतवाडी) याला ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान, मोटारसायकल त्यानेच चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने ही गाडी सावंतवाडी शहरातच लपवून ठेवली होती जी पोलिसांनी हस्तगत केली आहे. या धडक कारवाईत पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे व सुरेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी जप्त केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.











