इमारतीचे सांडपाणी मुख्य रस्त्यावर

नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी घेतली गंभीर दखल
Edited by: विनायक गांवस
Published on: January 11, 2026 14:56 PM
views 125  views

सावंतवाडी : शहरातील चिवारटेकडी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका इमारतीचे सांडपाणी मुख्य रस्त्यावर सोडले जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास सावंतवाडी शहरात येणाऱ्या पर्यटकांना व शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसापासून सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तर दुर्गंधीत पाणी मुख्य रस्त्यावर वाहत जात आहे. याबाबत संबंधित इमारतीच्या प्रमुखांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांनी नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली. 

तात्काळ नगरसेवक बाबू कुडतरकर व शिवसेनेचे कार्यकर्ते सागर गावडे यांनी प्रत्यक्ष येऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. संबंधित इमारतीचे पाणी पाईपद्वारे आंबोलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गटारात सोडल्याचे निदर्शनात आले. या मार्गावरील रस्त्याचे गटार बंदिस्त झाल्याने सांडपाण्याबरोबरच उष्टे खरकटे गाळ गटारात तुंबून ते सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना व पर्यटकांना आरोग्यास धोका ठरू शकतो. नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी तत्काळ आरोग्य विभागाचे निरीक्षक विनोद सावंत यांना संपर्क करून माहिती दिली. या दुर्गंधी पाण्याची उपाययोजना करावी व संबंधित इमारतीच्या प्रमुखांना आपल्या जागेत सांडपाण्याची व्यवस्था करावी अशी सूचना करावी, अन्यथा कारवाई करावी असे आदेश केले. नागरिकांच्या व पर्यटकांच्या आरोग्यास अपायकारक असे सांडपाणी रस्त्यावरील गटारात सोडल्याचे निदर्शनात अगर तक्रारी आल्यास संबंधित घर मालकावर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येईल. संबंधित घरमालकांन आपल्या जागेतच त्याच्या संदर्भात उपायोजना करावी असे आवाहन नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले आहे. यावेळी उमेश सावंत, संतोष परब उपस्थित होते. नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी रविवारी श्री उपरकर देवस्थान ते लाडाचीबाग, चिवारटेकडी भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या मार्गावरील रस्त्याची वाढलेली झाडी तोडणे, गटार खोदाई, रस्त्याची साईट पट्टी मातीने भरणे, तसेच या मार्गावर नव्याने बसवण्यात येत असलेले स्ट्रीट लाईट काही ठिकाणी बसवण्यात आले नाही त्या श्री देव उपरलकर देवस्थान पासून ते पुढील काही अंतरावर ठिकाणी लवकरच स्ट्रीट लाईट बसवणे, उपरलकर देवस्थान पासून पुढील वळणावर रस्त्याच्या बाजूला  कचरा फेकला जात असल्याने उपायोजना करण्याचे व अन्य कामांबाबत लक्ष घातले आहे. त्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. या भागातील समस्या असतील तर आपल्याकडे मांडाव्यात त्या सोडवण्याचे आपले प्रयत्न राहील असे श्री कुडतरकर यांनी यावेळी सांगितले.