
दोडामार्ग : साटेली-भेडशी येथील मुख्य रस्ता ते थोरलेभरड पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून द्यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. रस्त्याच्या कामाला विरोध करणारी एक महिला कागदोपत्री मृत दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात ती जिवंत आहे, असा धक्कादायक प्रकार आंदोलनकर्त्यांनी उघड केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आणि याची एकच चर्चा तालुक्यात सुरू झाली.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत तहसीलदार राहुल गुरव यांनी कागदपत्रांची सखोल तपासणी करत अधिक चौकशी करून सोमवारी याबाबत माहिती देण्याचे आश्वासन भाजपा पदाधिकाऱ्यांना दिले आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने तो जिवंत व्यक्तीची आपण प्रत्यक्ष भेट घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली.
साटेली-भेडशी येथील ग्रामस्थांनी मुख्य रस्ता ते थोरले भरडपर्यंतचा रस्ता तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून द्यावा, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच होते. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर व तालुका उपाध्यक्ष आनंद तळणकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या कामाला विरोध करणारी व कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये दावा दाखल केलेली महिला कागदोपत्री मृत दाखवण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला. मात्र ती महिला प्रत्यक्षात जिवंत असल्याचा दावा त्यांनी केला.
हा प्रकार लक्षात येताच संबंधित कागदपत्रे तहसीलदार राहुल गुरव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सुमारे दोन तास कागदपत्रांची तपासणी केली. या प्रकरणात फेरफार झाल्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक सखोल चौकशी करून सोमवारी याबाबत स्पष्ट माहिती देऊ, असे त्यांनी आंदोलकांना सांगितले
आपल्या विभागाने जिवंत व्यक्तीला मृत दाखवले आहेत व याचाच फायदा घेत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या जमिनीत इतरांची नावे वारस म्हणून लावली आहेत. यात मोठा भ्रष्टाचार असून संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी लावावी अशी मागणी केली. या मागणीला तहसीलदार राहुल गुरव यांनी सहमती दर्शवली.
कागदो पत्री मृत व्यक्तीची फाईल गायब
दरम्यान भजपा पदाधिकारी तहसीलदार गुरव यांच्याशी चर्चा करते वेळी एक धक्का दायक माहिती उघड झाली आहे. शमशाद बेगम अहमत शहा या महिलेला
कागदो पत्री मृत करून 7/12 ऱ्यावर बोगस वारस लावले त्या नंतर त्या महिलेची जमीन संबंधितांनी विक्री केली. व सदर प्रकरण उघडकीस येऊ नये त्यासाठी सदर ची कागदोपत्री फाईलच गायब केल्याचा आरोप भाजपा पदाधिकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सदर विषयाची सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी दोडामार्ग भाजप पदाधिकऱ्यांनी केली आहे.
मृत्यू प्रमाणपत्र आणले कुठून ?
जिवंत असलेल्या शामशाद बेगम अहमत शहा या महिलेला कागदो पत्री मृत करून वारस तपास करण्यासाठी मृत्यू प्रमाण पत्र आणले कुठून? असा सवाल भाजपाच्या पदाधिकऱ्यांनी तहसीलदार यांना विचारला. साटेली भेडशी ग्रामपंचायत मध्ये मृत्युंची नोंद नसल्याचे ग्रामपंचायतने सांगितले आहे. असे असताना सदर व्यक्तीचा मृत्यू दाखला आणला कुठून? असा प्रश्न उपस्थितांनी तसाहीदार गुरव यांना विचारला










