
सावंतवाडी : गावच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुलभ असणे आवश्यक आहे, हे ओळखून वेर्ले गावात ‘घर तिथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला आहे. या संकल्पांतर्गत राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचे शानदार उद्घाटन भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
वेर्ले राणेवाडीतील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक घरांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्क्या रस्त्यांची उणीव होती. ग्रामस्थांची ही अडचण दूर करण्यासाठी विशाल परब यांनी पुढाकार घेतला आहे. राणेवाडीतील एकूण ६८ घरांना रस्ते जोडण्याचे नियोजन आहे. या उद्घाटन प्रसंगी विशाल परब यांच्यासोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक, सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, जिल्हा बँक सदस्य रवी मडगावकर, सैनिक बँक चेअरमन बाबूराव कविटकर, चंद्रकांत राऊळ, स्वप्नील राऊळ, आंतोन रॉड्रीक्स, दिलीप राऊळ, पुंडलीक कदम यांच्यासह राणेवाडीतील ग्रामस्थ आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घराघरापर्यंत रस्ता पोहोचणार असल्याने स्थानिक महिला आणि वृद्धांनी समाधान व्यक्त केले आहे.











