'संगीत मत्स्यगंधा'चा कोकण दौरा यशस्वी

Edited by: विनायक गांवस
Published on: December 19, 2025 16:05 PM
views 9  views

सावंतवाडी : प्रा. वसंत कानेटकर लिखित दर्जेदार मराठी संगीत नाटक संगीत मत्स्यगंधा या नाटकाचा पाच प्रयोगांचा कोकण दौरा नुकताच संपन्न झाला. कणकवली, वेंगुर्ला, चिपळूण, दापोली आणि रत्नागिरी येथे या नाटकाचे प्रयोग सादर करण्यात आले. या नाटकाची निर्मिती श्री परमेश्वर प्रॉडक्शन या संस्थेने केली असून नाटकाचे कार्यकारी निर्माता आणि दिग्दर्शन सिनेनाट्य अभिनेते-दिग्दर्शक बाळ पुराणिक यांनी केले आहे. संगीत नाटकाचा व्यावसायिक दौरा करणारी कोकणातील ही  पहिलीच प्रॉडक्शन कंपनी आहे. महाभारताची जननी समजल्या जाणाऱ्या सत्यवतीची कथा या नाटकात मांडली आहे.

पराशर ऋषीवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठूर होते. तिच्या या निष्ठुरपणाचे परिणाम युवराज देवव्रताला भोगावे लागतात. आपल्या पित्याला त्यांचे प्रेम मिळवून देण्यासाठी तो अखंड ब्रह्मचर्य धारण करण्याची प्रतिज्ञा घेतो. महाभारतातील ही अतिशय महत्त्वाची घटना या नाटकात  मांडली असून संगीत आणि संवादांनी परिपूर्ण असे हे नाटक आहे.

या नाटकाचे मूळ संगीत कै. पंडित जितेंद्र अभिषेक यांचे असून या नाटकात देवाघरचे ज्ञात कुणाला, साथ देती हिमशिखरे, नको विसरू संकेत, गुंतता हृदय, तव भास अंतरा, गर्द सभोवती, अर्थशून्य भासे अशा एकाहून एक सरस, अप्रतिम आणि लोकप्रिय नाट्यपदांनी हे नाटक सजले आहे. नाटकात स्वप्निल गोरे (पराशर), केतकी सावंत (सत्यवती) यांनी गायलेल्या नाट्यपदांनी सर्वत्र रसिकांनी वन्समोअर देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  बाळ पुराणिक (भीष्म), गणेश दीक्षित (चंडोल)  आशुतोष चिटणीस (धीवर), शुभम परब (शंतनू), तेजस प्रभूदेसाई (प्रियदर्शन), उमा जडये (अंबा) यांनी आपापल्या भूमिका चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला. नाटकात संगीत साथ श्री प्रसाद शेवडे (ऑर्गन) श्री. निरज भोसले (तबला) यांनी केली आहे. नाटकाची प्रकाशयोजना अभिषेक कोयंडे यांनी केली असून रंगभूषा संजय जोशी, वेशभूषा वैभवी पुराणिक तसेच पार्श्व संगीत गणेश प्रसाद गोगटे  यांचे असून पार्श्वसंगीत संयोजन आज्ञा कोयंडे यांनी केले आहे. रंगमंच व्यवस्था रावजी पार्सेकर आणि सहकारी यांनी सांभाळली. अभिजात मराठी संगीत नाटकाला प्रेक्षक वर्ग लाभावा तसेच संगीत नाटकाला नवीन प्रेक्षक वर्ग तयार व्हावा यासाठी सर्वत्र संगीत नाटकांचे प्रयोग करण्याचा मानस कार्यकारी निर्माता बाळ पुराणिक यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. 

सामाजिक संस्था, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, राजकीय पक्षाचे नेते , पदाधिकारी यानी पुढाकार घेउन आमच्या संगीत नाटकांच्या प्रयोगाचे आयोजन करावे आणि रसिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन कार्यकारी निर्माता, दिग्दर्शक बाळ पुराणिक यांनी केले आहे.