
सावंतवाडी : स्वराज्य दिव्यांग संस्था, सावंतवाडी तालुका यांचा नववर्ष कॅलेंडर प्रकाशन व दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधनांचे वाटप कार्यक्रम येथील काझी सभागृहात मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सकल हिंदू मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्हचे संपादक श्री. सीताराम गावडे, राजे प्रतिष्ठानचे संतोष तळवणेकर, महेंद्र चव्हाण, कृष्णा पाटील, माडखोल गावचे मानकरी राऊळ, निगडे, गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर, संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल लातीये तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना सिताराम गावडे यांनी दिव्यांगांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज अधोरेखित केली.“दिव्यांग या शब्दातच दिव्यशक्ती दडलेली आहे. शरीर अपंग असले तरी या व्यक्तींमध्ये अपार ऊर्जा आणि आत्मविश्वास असतो. त्यामुळे दिव्यांगांना सहानुभूतीची नव्हे, तर त्यांच्या हक्कांची गरज आहे. त्या हक्कांसाठी तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ज्यांना दृष्टी नाही त्यांनी जगाला पाहायला शिकवले,ज्यांना पाय नाही त्यांनी धावण्याचा अर्थ शिकवला, ज्यांना हात नाही त्यांनी सुंदर चित्रे घडवली हेच दिव्यांगांचे खरे पराक्रम आहेत. हीच दिव्यशक्ती आहे.”दिव्यांग व्यक्तींनी स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी आणि ‘मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही, मी स्वतःच्या पायावर उभा आहे’ हा आत्मविश्वास बाळगावा, असा संदेश देताना गावडे म्हणाले की, परमेश्वर निश्चितच अशा जिद्दी व्यक्तींना यश देतो व मनोकामना पूर्ण करतो. यावेळी त्यांनी समाजालाही स्पष्ट शब्दांत आवाहन केले.“दिव्यांगांवर हसू नका, कारण ही वेळ कोणावरही येऊ शकते. त्यांना त्यांचे हक्क मिळवून द्या, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्यांना सहानुभूतीपेक्षा सहकार्याची अधिक गरज आहे. माणूस शरीराने अपंग असला तरी चालेल, पण मनाने अपंग असेल तर काहीही साध्य करू शकत नाही. जो मनाने सक्षम आहे, तो कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी संतोष तळवणेकर, कृष्णा सावंत, ॲड. नीता सावंत कोकण कविटकर, कृष्णा राऊळ यांनीही दिव्यांग सक्षमीकरण, सामाजिक स्वीकार आणि सहकार्य याबाबत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास दिव्यांग बांधवांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम केवळ कॅलेंडर प्रकाशनापुरता मर्यादित न राहता, दिव्यांग सशक्तीकरणाचा आणि समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देणारा ठरला.











