
दोडामार्ग : आडाळीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून तब्बल पाच वनराई बंधारे बांधले. सरपंच पराग गांवकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत महिला व तरुणांनी सलग दोन रविवारी हा उपक्रम राबविला. आडाळी - फोंडीये ग्रुप ग्रामपंचायतने पंचायत राज अभियान अंतर्गत लोकसहभागतून स्वछता व समृद्धता उपक्रम हाती घेतला आहे. गावातील पारंपरिक वायंगणी शेती नामशेष झाल्यामुळे पाणी अडविण्यासाठीचे माती व झाडझाडोरा वापरून घातले जाणारे बंधारेही इतिहास जमा झाले. त्यामुळे जलसंधारणाचे पारंपरिक काम थांबले.
पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने आडाळी सरपंच पराग गांवकर यांनी लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. त्याला महिला व युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सलग दोन रविवार श्रमदानं करून खडशी नदी व खालचीवाडी, कोसमवाडी येथील ओढ्यावर पाच बंधारे बांधले. या बंधाऱ्यामुळे गावातील ओढे जलसमृद्ध बनले आहेत. उपसरपंच विशाखा गांवकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल परब, संजना गांवकर, निशा गांवकर, सानिका गांवकर, परेश सावंत, अंगणवाडी सेविका ममता सावंत, आशा वर्कर मिताली मेस्त्री यांच्यासह महिला व युवकांच्या सहभागातून हे अभियान यशस्वी झाल्याबद्दल गांवकर यांनी आभार मानले.










