
देवगड : किंजवडे मतदारसंघात दूध उत्पादक शेतकरी क्लस्टरची निर्मिती होत असून, येथून ५०० लिटरहून अधिक दूध उत्पादन बाहेर जात असल्याची बाब कौतुकास्पद आहे. भविष्यातील दुग्ध व्यवसायाची गरज ओळखून शेतकरी एकत्र येत क्लस्टर उभारणी करत आहेत, ही निश्चितच चांगली बाब आहे. मात्र, केवळ क्लस्टर स्थापन करून उपयोग नाही, तर त्यामागील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य व अनुदान मिळणे गरजेचे आहे. यासाठी शासन, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून पाठपुरावा होणे आवश्यक आहे. आर्थिक तरतूद झाली नाही तर भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित विभागांनीही आर्थिक पाठबळ देण्यासाठी तितकेच योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सावी लोके यांनी केले.
किंजवडे ग्रामपंचायत येथे एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा सिंधुदुर्ग केंद्र पुरस्कृत नंदिनी दूध सहकारी संस्था मर्यादित, किंजवडे-तोरसाळे-आरे दूध उत्पादक शेतकरी क्लस्टर निर्मिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सावी लोके बोलत होत्या. यावेळी देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, सुनील पारकर, पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर, संजना लाड, समृद्धी कदम, गोकुळ दूध संघाचे राजेश गावकर, किंजवडे उपसरपंच विनय पाडावे, नंदिनी संस्थेचे अध्यक्ष सुरेश हरम, उपाध्यक्ष लक्ष्मण लोके, सचिव अनंत कडव आदी उपस्थित होते.
जि.प सदस्या सावी लोके पुढे म्हणाल्या की, पशु विभागामार्फत शेतकरी वर्गासोबतच लोकप्रतिनिधींनाही दुग्ध व्यवसायात येणाऱ्या अडचणी व या क्लस्टरचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. आवश्यक आर्थिक तरतूद आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास क्लस्टर निर्मितीचे प्रयत्न निश्चितच यशस्वी होतील. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करून अधिकाधिक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाशी जोडणे गरजेचे आहे.
यावेळी सभापती गणेश राणे यांनीही दुग्ध व्यवसायाच्या वाढत्या संधींकडे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांवर गुरांचा वावर वाढला असून, देवगड तालुक्यातही बाहेरील तालुक्यांतून गुरे आणून सोडली जात आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, त्यात अनेकदा निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती थांबविण्यासाठी योग्य नियोजन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
किंजवडे येथील शेतकरी सुरेश हरम यांनी ६० लिटर दूध उत्पादनापासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली आणि आज किंजवडेतून ५०० लिटर दूध बाहेर जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून दुग्ध व्यवसायाला चांगली उभारी मिळत असून, देवगड तालुक्यातील देवगड मंडळ आणि पडेल मंडळ परिसरातही या व्यवसायाचा विस्तार होणे आवश्यक आहे. दुग्ध व्यवसायाचा विस्तार झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक उभारी मिळून या व्यवसायाला नवी संजीवनी मिळेल, असा विश्वास गणेश राणे यांनी व्यक्त केला.
पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना पशुधनाचे महत्त्व, दुग्ध व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, खर्च आणि नफा याबाबत सातत्याने मार्गदर्शन करावे. किंजवडे येथे आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषद गटात राबविल्यास शेतकऱ्यांमध्ये दुग्ध व्यवसायाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होईल, असेही राणे यांनी सांगितले.
मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर आणि देवदत्त कदम यांनी मनोगत व्यक्त केले. पशुवैद्यकीय अधिकारी तसेच गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय, पशुपालन, दूध उत्पादन वाढ आणि पशुधन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध सूचना व अडचणीही जाणून घेण्यात आल्या. मेळाव्यास दीडशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच मंगेश जामसंडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले.










