
कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील हिंदू कॉलनी येथील खुल्या जागेच्या वादावर आता प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आले आहे. नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरसे यांनी २९ जून २०२६ रोजी दिलेल्या अर्जाच्या आणि १० जुलै २०२६ रोजीच्या नियोजित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीने त्यांना लेखी पत्र पाठवून सद्यस्थितीची माहिती दिली आहे, तसेच उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या जागेबाबत अनेक वर्षांपासून विविध महसूल आणि दिवाणी न्यायालयांमध्ये खटले सुरू असून, बहुतांश निकाल प्रशासनाच्या विरोधात आणि कुळ दावेदाराच्या बाजूने लागल्याचे या पत्रातून स्पष्ट झाले आहे.
१९९३ ची मंजुरी व कुळ दावा मौजे कुडाळ येथील स.नं. ४८ आणि स.नं. ४९ मधील जागेला ३ एप्रिल १९९३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निवासी रेखांकनासाठी मंजुरी दिली होती. मात्र, या रेखांकनामधील खुल्या क्षेत्रापैकी ३७ गुंठे (०.३७.०० हे.आर.) जागेवर २००४ साली महादेव तुकाराम आरेकर यांनी स्वतःला 'कुळ' घोषित करण्यासाठी अप्पर तहसीलदार, कुडाळ यांच्याकडे दावा दाखल केला होता. कुळ वहिवाटीबाबत तहसीलदार (कुडाळ), उपविभागीय अधिकारी (सावंतवाडी) आणि महाराष्ट्र महसूल प्राधिकरण (मुंबई) या सर्व स्तरांवर खटले चालले. या सर्व प्राधिकरणांनी महादेव आरेकर यांच्या बाजूने निर्णय दिले. १८ जानेवारी २०१७ रोजीच्या तहसीलदारांच्या आदेशानुसार आरेकर हे या जागेचे कुळ असल्याचे निश्चित झाले आणि त्यानुसार जमिनीचे पोटहिस्से (५अ/१ व ५अ/२) करण्यात आले.
मूळ मालक बाक्रे यांनी ही खुली जागा ग्रामपंचायत कुडाळ यांच्याकडे बक्षिसपत्राद्वारे हस्तांतरित केली होती. परंतु, या बक्षिसपत्राच्या आधारे झालेली फेरफार नोंद क्र. ७७९० रद्द करण्यासाठी आरेकर यांनी अपील केले होते. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी (सावंतवाडी), अप्पर जिल्हाधिकारी (सिंधुदुर्ग) आणि अप्पर आयुक्त (कोकण विभाग) या तिन्ही वरिष्ठ प्राधिकरणांनी आरेकर यांच्या बाजूने आदेश देऊन ती फेरफार नोंद रद्द करण्याचे निर्देश दिले. सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) कुडाळ, जिल्हा न्यायालय ओरोस आणि थेट मुंबई उच्च न्यायालयाने देखील या खुल्या क्षेत्रावर महादेव आरेकर यांचा शांततामय ताबा असल्याचे मान्य केले आहे. तसेच ग्रामपंचायतीने यात कोणताही अडथळा आणू नये, असे आदेश दिले आहेत.
नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे की, वरील सर्व न्यायालयीन आदेश आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करूनच आकारफोड पत्रकातील दुरुस्तीसाठी 'नाहरकत दाखला' (NOC) देण्यात आला आहे. मात्र, नगरपंचायत सार्वजनिक जागा वाचवण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करत आहे. एकूण १.४१.४१ हे.आर. क्षेत्रापैकी १.०४.४१ हे.आर. इतके रस्ते व खुली जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित करून घेण्याची कार्यवाही तात्काळ केली जात आहे. उर्वरित ३७ गुंठे जागेबाबत नगरपंचायतीने कायदेशीर सल्लागारांची (विधिज्ञ) नियुक्ती केली असून त्यांचा अभिप्राय प्राप्त झाला आहे. जुन्या विधीज्ञांकडून तिन्ही केसेसच्या निकालपत्रांच्या प्रमाणित प्रती मागवण्यात आल्या आहेत.
हा संपूर्ण विषय कायदेशीर आणि योग्य कार्यवाहीसाठी मा. नगराध्यक्ष व सर्वसाधारण सभेसमोर सविस्तर ठेवण्यात येत आहे. नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रशासन सकारात्मक विचार करून योग्य ती कायदेशीर पावले उचलत आहे. त्यामुळे १० जुलै २०२६ रोजीचे आपले नियोजित उपोषण मागे घ्यावे आणि नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती मुख्याधिकारी, कुडाळ नगरपंचायत यांनी पत्राद्वारे केली आहे. या पत्राची प्रत माहितीसाठी नगरविकास शाखा (सिंधुदुर्ग) आणि पोलीस निरीक्षक (कुडाळ) यांनाही पाठवण्यात आली आहे.











