'त्या' भेटीविषयी अखेर संदेश पारकर बोललेच

शेवटी निर्णय तर घ्यावा लागणारच
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 24, 2025 09:50 AM
views 2179  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मंगळवारी सायंकाळनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर संदेश पारकर शिंदे शिवसेनेत जाणार का? अशा‌ चर्चांना‌ उधाण आले आहे. याच विषयी संदेश पारकर यांच्याशी संपर्क साधला असता, ही भेट फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे आभार मानण्यासाठी होती, असे स्पष्ट केले. मात्र, कणकवली शहराचा विकास करायचा असेल, तर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे, असेही पारकर म्हणाले. अर्थातच पारकर यांचा 'तो' निर्णय नेमका काय असणार? पारकर शिंदे शिवसेनेत जाणार का?  असा प्रश्न आता कणकवलीकरांना पडला आहे.


संदेश पारकर यांच्या विजयानंतर निलेश राणे यांनी मीडियाशी बोलताना 'संदेश पारकर यांना पाठिंबा देताना आमच्यात काही चर्चा झाल्या आहेत. मात्र ,सध्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे पारकर यांना भेटून सविस्तर बोलू', असे विधान केले होते. आता पारकर यांनी एकनाथ शिंदे याची भेट घेतल्याने अर्थातच पारकर पुन्हा एकदा पक्षीयदृष्ट्या नवीन समीकरण अनुभवणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.