
कुडाळ : महावितरणमध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या कंत्राटी कामगारांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे आणि प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांची भेट घेऊन कामगारांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे. "पगारात कपात मात्र कामाचा ताण प्रचंड" अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या या कामगारांनी आता लोकप्रतिनिधींकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
नेमके प्रकरण काय?
महावितरणमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला या कामगारांना १९,००० रुपयांपेक्षा जास्त पगार मिळत होता. मात्र, सध्या हा पगार अचानक कमी करून १६,७०० रुपये करण्यात आला आहे. वाढत्या महागाईच्या काळात पगार वाढण्याऐवजी तो कमी झाल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
या संदर्भात ४ डिसेंबर रोजी सभा घेऊन कंत्राटदारांमार्फत महावितरणला निवेदने देण्यात आली होती, मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
कामगारांच्या प्रमुख पाच मागण्या:
१. कामाचे स्वरूप स्पष्ट करा: ठेकेदाराला दिलेल्या वर्क ऑर्डरनुसार कामगारांची नेमकी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत, याची लेखी स्पष्टता हवी.
२. समान काम, समान वेतन: महावितरणच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांइतकेच काम कंत्राटी कामगार करत असल्याने त्यांनाही 'समान काम, समान वेतन' या तत्त्वाप्रमाणे मोबदला मिळावा.
३. वेतन कपात व बोनस: पूर्ण २६ दिवस काम करूनही पगार कमी का येत आहे? कपात केलेली रक्कम आणि बोनसबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी.
४. कामाचे तास व भत्ता: कराराप्रमाणे ८ तास काम अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६ ते १८ तास काम करून घेतले जाते. त्यामुळे ओव्हरटाईम आणि पेट्रोल भत्ता मिळावा.
५. नोकरीची सुरक्षा: नवीन 'विद्युत सहाय्यक' भरती प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या अनुभवी कंत्राटी कामगारांना कामावरून काढू नये.
आमदार निलेश राणे यांचे आश्वासन
या सर्व गंभीर तक्रारी ऐकून घेतल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी कामगारांना आश्वस्त केले की, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर लवकरच सकारात्मक मार्ग काढला जाईल. अन्यायग्रस्त कामगारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
"आम्ही प्रामाणिकपणे सेवा देत असूनही महावितरण आमचे शोषण करत आहे. हक्काचा पगार कापला जात असून कामाचे तास मात्र वाढवले आहेत. आता केवळ आमदार निलेश राणे यांच्या मध्यस्थीने आम्हाला न्याय मिळेल हीच शेवटची आशा आहे."
कंत्राटी कामगार यांनी यावेळी व्यक्त केली भावना.
आमदार निलेश राणे यांना निवेदन देतेवेळी प्रसाद चव्हाण, दिनेश राऊळ, विनय येरम, लक्ष्मण नांदोस्कर, चेतन सावंत, युगेश्वर माने, दर्शन लाड, अभय जोशी, कृष्णा पवार, श्रीराम कुंभार, अक्षय परब, दाजी कुंभार उपस्थित होते.











