
कुडाळ : बीएलओ कामा विरोधात कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या नेतृत्वाखाली एकवटत कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लाक्षणिक धरणे आंदोलन छेडत तहसीलदार प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी बीएलओचे काम करण्यास शिक्षकांनी कडाडून विरोध दर्शवला. आजपासूनच बीएलओचे काम करणे पूर्णपणे बंद करण्यात येत असून, प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत, या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हाभर आंदोलन उभारले जाईल असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने यावेळी प्रशासनाला दिला.
कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची बीएलओ कामासाठी प्रशासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीने हे आंदोलन छेडले. यावेळी चंद्रकांत अणावकर, राज्य सहसचिव राजन कोरगांवकर, राज्य कार्य. सदस्य दादा जांभवडेकर व सचिन मदने, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, कुडाळ तालुकाध्यक्ष शशांक आटक, तालुका सचिव महेश गावडे, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, जिल्हा कार्य. सदस्य आपा सावंत, संतोष वारंग, प्रसाद वारंग, संजना राऊळ, भार्गवी कापडी, सुगंधा अणावकर, सावली सुर्वे, गोपाळ गावडे आदींसह तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधीत केले. दरम्यान नायब तहसीलदार श्री.गवस व निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी शिक्षक समितीचे निवेदन स्वीकारले.











