
वेंगुर्ले : नुकत्याच झालेल्या वेंगुर्ले नगरपालिका निवडणुकीत काही मतांनी शिवसेनेच्या नागेश उर्फ पिंटू गावडे यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र याचे दुःख करत न बसता नागेश गावडे आपल्या स्वभावाप्रमाणे पुन्हा जनसेवेत रुजू झालेले पाहायला मिळाले. मंगळवारी वेंगुर्ले शहरातील दाभोली नाका येथे झालेल्या अपघातात पायाला गंभीर दुखापत झालेल्या दुचाकीस्वाराला त्यांनी स्वतः आपल्या रुग्णवाहिकेतून स्वतः रुग्णवाहिका चालवत कुडाळ येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. एवढेच नव्हे तर संबंधित दुचाकीस्वाराला त्यांनी आर्थिक मदतही मिळवून दिली. या त्यांच्या कार्याचे शहरात कौतुक होत आहे.
मंगळवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी वेंगुर्ले शहरातील दाभोली नाका येथे काही पर्यटक युवकांच्या चारचाकी व दुचाकीत अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच त्याला तात्काळ वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अपघात ग्रस्त दुचाकीस्वाराच्या पायाला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी तात्काळ रुग्णवाहिकेने त्या दुचाकीस्वारला स्वतः रुग्णवाहिका चालवत कुडाळ येथे खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. तसेच सुमारे ८५ हजार रुपये आर्थिक मदतही थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा करण्यासाठी गावडे यांनी पाठपुरावा केला.











