
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जांभवडे-खोचरेवाडी येथे गडनदी पात्रावरील पुलाची संरक्षक भिंत कोसळून पूल अंशतः खचल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सुमारे १०० लोकवस्ती असलेल्या वाडीला अतोनात हाल सहन करावे लागत आहे. नागरिकांच्या दैनंदिन येण्या-जाण्यावर गंभीर परिणाम झाला आहे. ऐन पावसाळ्यात उद्भवलेल्या या संकटामुळे ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जांभवडे-खोचरेवाडी पुलाची अवस्था अत्यंत बिकट आणि धोकादायक बनली होती. याबाबत जांभवडेचे सरपंच अमित मडव यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित शासकीय विभागाकडे लेखी स्वरूपात वारंवार पाठपुरावा केला होता. संभाव्य धोका ओळखून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली होती, मात्र प्रशासनाने या गंभीर विषयाकडे सपशेल दुर्लक्ष केले. अखेर प्रशासकीय अनास्थेमुळेच हा पूल खचल्याचा थेट आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पूल खचल्यामुळे खोचरेवाडीतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी बाजारात जाणे कठीण झाले असून, शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, वाडीतील एखाद्या रुग्णाला उपचारासाठी तातडीने बाहेर न्यायचे असल्यास मोठी कसरत करावी लागत आहे.
सध्या निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेत ढासळलेल्या भागाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, हा संपूर्ण मार्ग गडनदीच्या पात्रातून जात असल्याने, पावसाळ्यात नदीची पाणीपातळी वाढल्यास या तात्पुरत्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरणार आहे. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपातील दुरुस्तीवर न थांबता, या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी आणि मजबूत पूल उभारावा, अशी आग्रही मागणी जांभवडे ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.










