LIVE UPDATES

सावंतवाडीच्या साईश गावडेंचा कोल्हापुरात पुन्हा डंका!

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 17:19 PM
views 49  views

सावंतवाडी : आपल्या गुणवत्तेची आणि सर्जनशीलतेची छाप कोल्हापूरच्या भूमीत उमटवत सावंतवाडीच्या साईश गावडे यांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोल्हापूर येथील ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक पटकावत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण यशामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

साईश गावडे हा डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. २०२४ मध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर त्याने ‘शाहू सर्कलचा महाराजा’ रिल स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला आणि थेट प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कलागुणांची दमदार झलक दाखवली. त्यानंतर २०२५ मध्ये त्याने या स्पर्धेत तृतीय क्रमांक, तर २०२६ मध्ये पुन्हा तृतीय क्रमांक पटकावत आपल्या यशाची मालिका कायम ठेवली.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे विविध स्तरातून साईशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साईश गावडे सध्या ऑल इंडिया फिजिओथेरपी कॉन्फरन्ससाठी दिल्ली येथे गेला आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील नामवंत फिजिओथेरपिस्ट मार्गदर्शन करणार आहेत. फिजिओथेरपीच्या शिक्षणासोबतच सर्जनशील क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साईशच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे.