
देवगड : यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांची उंची सातत्याने वाढवली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगभूत प्रतिभेची ओळख करून ती विकसित करत प्रतिभेचे पंख पसरावेत, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सदानंद पवार यांनी केले.
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष अॅड.अजित गोगटे, सचिव प्रवीण जोग, उपाध्यक्षा नम्रता तावडे, पुष्पलता मराठे, महेश रानडे, राजेंद्र वालकर, मुख्याध्यापक सुनील जाधव उपस्थित होते.
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत व प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावरच व्यक्तिमत्त्व घडत असते. अपयशामुळे खचून न जाता त्यातून बोध घेऊन पुढे वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील यशापुरते मर्यादित न राहता मूल्याधिष्ठित शिक्षण, शिस्त व सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड.अजितराव गोगटे म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते असून, सुजाण विचारसरणी, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोनातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवून देशाचे जबाबदार व कर्तृत्ववान नागरिक बनावे, असे आवाहनही केले.
मागील वर्षी प्रत्येक इयत्तांमध्ये व विविध स्पर्धांमध्ये यशवंत ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रखमेचे पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षाचा इयत्ता पाचवी च्या वर्गाचा “स्वच्छ सुंदर वर्ग पुरस्कार“ म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावरील गुणवंत खेळाडूंना संस्था सचिव प्रवीण जोग यांच्या मार्फत प्रत्येकी रोख रुपये १ हजारचे पारितोषिक किंजल अदम, तनिष्का वारीक, रियान राऊत, वेद गोगटे यांना देऊन गौरविण्यात आले. तसेच यावर्षीची बेस्ट स्टुडंट म्हणून सदानंद पवार पुरस्कृत १ हजारचा पुरस्कार किंजल संतोष अदम हिला देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले. पारितोषिक वितरणाचे बक्षीस वाचन सतीशकुमार कर्ले यांनी केले. तर अहवाल वाचन सुजित फडके यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञा चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन संजय पांचाळ यांनी केले.













