
सावंतवाडी : पाळीव प्राण्यांना क्रूरतेने वागवून त्यांची जीवघेणी झुंज लावणे कायद्याने गुन्हा असतानाही सावंतवाडी तालुक्यातील तळवडे - गोठावडेवाडी येथे बैलांची झुंज लावणाऱ्या चार जणांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज, १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथील गोठावडेवाडी परिसरात बैलांची झुंज लावली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी पाळीव प्राण्यांना क्रूरतेने वागवून त्यांची झुंज लावत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस हवालदार मंगेश लक्ष्मण शिंगाडे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेले आरोपी :
पोलिसांनी याप्रकरणी खालील चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यात उमेश अर्जुन सावंत (वय ४५, रा. पेंडूर मातोंड, ता. वेंगुर्ला), ओमकार भरत रेडकर (वय २६, रा. तळवडे गोठावडे, ता. सावंतवाडी), मोहन लव जोशी (वय ६०, रा. नेरूळ ठाकूरवाडी, ता. कुडाळ),शरद अनंत आसोलकर (वय ५५, रा. बाव गाळववाडी, ता. कुडाळ) या आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३०५/२०२५ अन्वये, बी.एन.एस. २०२३ चे कलम ३२५ सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(a) आणि ११(१)(n) नुसार कारवाई करण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांची झुंज लावणे किंवा त्यांना क्रूरतेने वागवणे हा कायद्याने गंभीर अपराध आहे. सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी अशा प्रकारचे कृत्य करू नये. कुठेही अशा घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यास सुजाण नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.














