
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूळ ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आणि वहिवाटीच्या रस्त्यावर असलेले १३ वर्षांचे जुने अतिक्रमण आमदार निलेश राणे यांच्या खंबीर भूमिकेनंतर अखेर हटवण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, आमदार निलेश राणे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. पोलिसांच्या बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आलं.
नेरूळ ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत आणि येण्या-जाण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर महादेव लक्ष्मण ठाकूर व सचिन महादेव ठाकूर यांनी अतिक्रमण केले होते. २०१२ मध्ये शिक्षण विभागाने मोजणी करून हद्द निश्चित केली होती, मात्र ती न जुमानता संबंधितांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून तिथे नारळाची रोपे लावली होती व पत्रा शेडचे बांधकाम केले होते. यामुळे वाडीतील ग्रामस्थांचा मार्ग बंद होऊन त्यांच्यावर अन्याय होत होता.
४ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा मोजणी करण्यात आली, परंतु संबंधितांनी त्यास विरोध केला. अखेर शिक्षण विभागाने ही बाब कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार राणे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ प्रशासनाला चौकशी करून रीतसर कारवाई करण्याचे आदेश दिले.
शिवसेना नेते दत्ता सामंत आणि माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक हे ग्रामस्थांच्या वतीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत होते. प्रशासकीय आदेश मिळताच यंत्रणा कामाला लागली आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
प्रशासनाकडून रस्त्याचे आश्वासन
कारवाईच्या वेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की, "प्रशासन नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहील. कामाला काही वेळा दिरंगाई होऊ शकते, पण चुकीची बाजू घेतली जाणार नाही." तसेच, भविष्यात एखाद्या निधीतून हा रस्ता पक्का करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ग्रामस्थांची श्रमदान आणि एकजूट
अतिक्रमण हटवताना ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली. अक्षय शिंदे, जितेंद्र परब, प्रसाद परब, अमेय शिंदे, अंकुश जोशी, गौरव ठाकूर, अक्षय जोशी, रमेश जोशी, मोहन जोशी, काशिनाथ जोशी, सिद्धेश सामंत, राजन नाईक, संकेत वरक, संजय वरक, अमित ठाकूर, गणेश ठाकूर, अमोल ठाकूर, सिद्धेश ठाकूर, विजय ठाकूर, साईश ठाकूर, हर्षद ठाकूर, प्रथमेश ठाकूर, नागेश ठाकूर, सुहास ठाकूर, अजय जोशी, उदय जोशी, मारुती ठाकूर, अमृता शिंदे, अंकिता शिंदे, दिपाली ठाकूर, जान्हवी परब, प्राची परब, संज्योति जोशी, करिष्मा जोशी, नंदिता गव्हाणकर, मीनाक्षी जोशी, रश्मी जोशी, अनामिका ठाकूर, आरती ठाकूर, सुहासिनी नाईक, कल्पना ठाकूर इत्यादी ग्रामस्थानी रस्ता मोकळा करण्यासाठी स्वतः मेहनत घेऊन सहकार्य केले.
प्रशासनाचे मानले आभार
या यशस्वी कारवाईबद्दल सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगधूम व इतर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी सरपंच भक्ती गाडी, पोलीस पाटील सुरेश नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष चव्हाण व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.













