
सावंतवाडी : श्री स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहून आध्यात्मिक संतपद प्राप्त केले आहे. तसेच स्वामी स्वरूपानंदानी म .गांधी व लोकमान्य टिळक यांच्या बरोबर भारतीय स्वातंत्र्य लढयातील सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला होता. त्या प .पू . स्वामी स्वरूपानंदांच्या पावन भूमीत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. श्री स्वामी स्वरूपानंद मंडळ पावस आणि गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी( स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी सांघिक चषक पटकावत कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला.
१५ डिसेंबर २०२५ रोजी गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य वकृत्व स्पर्धेमध्ये राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजचे तीन विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्यभरातील निष्णात वक्तृत्वपटू या स्पर्धेत सहभागी झाले असतानाही राणी पार्वतीदेवी जुनिअर कॉलेजची कुमारी अदिती अवधूत राजाध्यक्ष आपल्या ओघवत्या वाङशैलीने प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली . तिला रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले . तसेच या स्पर्धेसाठी एकूण तीन विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. त्यामध्ये रेश्मा संदेश पालव, चिन्मय शांताराम असनकर आणि अदिती अवधूत राज्याध्यक्ष सहभागी झाले होते . हे तिन्ही विद्यार्थी आपल्या उत्तम वाङकौशल्यामुळे सांघिक चषकाचे मानकरी ठरले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावसचे कार्यवाह ऋषीकेश पटवर्धन विश्वस्त डॉ. राजेंद्र जोशी आणि प्रा . मकरंद साखळकर, प्रा गोसावी विचारवंत, लेखक या समारंभाला उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयीन गटाचे परीक्षक म्हणून मा . अमृता नरसाळे मा . सोनाली खेडेकर यांनी काम पाहिले.
सलग दुसऱ्यांदा राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजने या चषकावर आपले नाव कोरले. या संघाचे मार्गदर्शक म्हणून महाश्वेता कुबल आणि स्मिता खानोलकर ह्याही उपस्थित होत्या. या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत उपाध्यक्ष डॉ .दिनेश नागवेकर, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, सचिव व्ही .बी . नाईक सर आणि खजिनदार सी एल नाईक यांनी तसेच राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉक्टर सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक आणि इतर सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत अभिनंदन करण्यात आले.













