
देवगड : ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी नोंदणी करिता २४ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत अशी माहिती देवगड तहसिलदार रमेश पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयान्वये ग्रामस्तरावर मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीत ग्राममहसूल अधिकारी,ग्रामविकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असे तीन सदस्य असणार आहेत.
शासन निर्णयान्वये गठीत समितीने करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनी निर्गमित करणेबाबत आदेशित केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी शासन निर्णयान्वये ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.













