LIVE UPDATES

आरवलीचे सचिन दळवी कोकण कृषी विद्यापीठाच्या 'शेतकरी फेलो २०२६' पुरस्काराने सन्मानित

Edited by: विनायक गांवस
Published on: May 20, 2026 19:11 PM
views 19  views

सावंतवाडी : आरवली येथील प्रगतशील शेतकरी सचिन उर्फ पुरुषोत्तम दळवी यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘शेतकरी फेलो २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त दापोली येथे आयोजित भव्य समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते दळवी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, पुढील तीन वर्षे ते विद्यापीठाचे ‘कृषिदूत’ म्हणून कार्यरत राहणार आहेत.

सचिन दळवी हे गेल्या २६ वर्षांपासून शेती क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. सन २००० मध्ये त्यांनी शेतातील काडीकचऱ्याचा योग्य वापर व्हावा आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळावी या उद्देशाने आवड म्हणून छोट्या प्रमाणावर गांडूळखत निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. पराग हळदणकर, डॉ. संदीप गुरव व डॉ. हेमंत बोराटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. गुरव आणि डॉ. बोराटे यांनी दळवी यांच्या या प्रयोगाची यशोगाथा प्रसिद्ध केल्यानंतर त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली. मिळालेल्या प्रेरणेतून दळवी यांनी गांडूळखत निर्मितीचा व्यवसाय व्यावसायिक स्तरावर नेला आणि अल्पावधीतच 'गांडूळखत वाले दळवी' म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी काथ्या उद्योगाचे रीतसर प्रशिक्षण घेऊन हा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर विस्तारला. स्वतःचा व्यवसाय सांभाळताना दळवी यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. कृषी विभागाच्या 'आत्मा' समितीवरही त्यांनी उल्लेखनीय व सकारात्मक काम केले आहे. आतापर्यंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, विविध शास्त्रज्ञ, राजकीय नेते, मंत्री आणि विद्यार्थी यांनी त्यांच्या प्रकल्पाला भेटी देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

वयाच्या ५६ व्या वर्षीही शेती आणि सामाजिक कार्यासाठी पूर्णपणे वाहून घेतलेल्या सचिन दळवी यांचा कृषी विद्यापीठाकडून झालेला हा सन्मान सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.