LIVE UPDATES

राष्ट्रीय युवा महोत्सवात स. ह. केळकर कॉलेजकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

'ढोल नाचा'ने जिंकली उपस्थितांची मने
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 23, 2026 21:16 PM
views 30  views

देवगड : येथील शिक्षण विकास मंडळ संचालित श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक सुवर्णक्षण रोवला गेला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे संपन्न झालेल्या 'आरोहण २०२६' या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा महोत्सवात महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांच्या चमूने 'लोकनृत्य' प्रकारात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करत कोकणच्या पर्यायाने राज्याच्या कलागुणांचा डंका राष्ट्रीय पातळीवर वाजवला.

राज्यस्तरीय युवा महोत्सवात केळकर महाविद्यालयाच्या संघाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर 'लोकनृत्य' प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला होता. या लक्षवेधी यशाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने या संघाची थेट राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवासाठी निवड केली होती.

श्रीनगर येथे दि. ११ मे ते १४ मे २०२६ या कालावधीत 'राष्ट्रीय युवा महोत्सव' आणि 'विकसित J & K यंग लीडर्स डायलॉग'चे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या कसलेल्या कलाकारांसमोर केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत लयबद्ध आणि दिमाखदार पद्धतीने  'ढोल नाच' सादर केला. त्यांच्या या जबरदस्त सादरीकरणाला देशभरातून आलेल्या प्रेक्षकांनी आणि परीक्षकांनी मनापासून दाद दिली.

या राष्ट्रीय पातळीवरील संघात साहिल दीपक जाधव,  प्रफुल्ल हजारे, साईनील धुरे, अभिषेक शिंदे, तनिष नाईक, साहिल दिलीप जाधव, योगीराज नार्वेकर, भावेश देवगडकर, करण मेस्त्री आणि रितेश धुरी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. या दिमाखदार नृत्याचे उत्कृष्ट कोरिओग्राफी आणि दिग्दर्शन  सागर सारंग आणि  रोहित माने यांनी केले होते.

सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रीय मंचावर मारलेली ही झेप देवगड तालुक्यासाठी भूषणावह ठरली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ, देवगडचे सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.