
सावंतवाडी : सर्वसाधारण सभेत ग्रो बीग टेक्नॉलॉजीला मुदतवाढ द्यावी की न द्यावी याबाबत ठराव घेण्यात आला असून सभागृहाने त्यावर निर्णय घेतला आहे. भाजप, शिवसेना, उबाठा शिवसेना आणि कॉग्रेस अशा सर्व पक्षांच्या नगरसेवकांकडून त्यांना मुदतवाढ देऊ नये असा ठराव घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. तसेच पाणी पुरवठा योजनेवर झालेल्या भ्रष्टाचारांचे आरोप खोडून काढत सभापती प्रतीक बांदेकर यांनी ठेकेदाराकडून नियमानुसार काम पुर्ण करून घेतल जाईल. शक्यतो गुरूत्वाकर्षणावरच ही योजना चालणार असून शहराला जास्तीत जास्त पाणी पुरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, जिमखाना मैदानावरील इमारत ही ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व कलादालनासाठी आरक्षीत आहे. १५ दिवसांसाठी ग्रो बीग कंपनीन मागणी केली होती. रोजगाराचा प्रश्न असल्याने आम्ही त्यांना सहकार्य केलं. मात्र, १५ दिवसांनी त्यांनी ही जागा सोडण अपेक्षित होतं. शहरात त्यांना यासाठी अनेक खासगी जागा उपलब्ध आहेत. आम्ही त्यांना एक रूम वापरासाठी दिली होती. मात्र, त्यांनी दोन रूमचा वापर केला आहे. ज्यावेळी याबाबत विचारलं तेव्हा उलट प्रश्न केलेत. हा सगळा प्रकार बघून सभागृहाने मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगारासाठी आमचाही प्रयत्न असून २७ जणांना लाड पागे योजनेखाली नगरपरिषदेत सामावून घेतले आहे. तसेच नगरपरिषदेच्या जागात रोजगार आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. मात्र, कालच्या प्रकारात नगरपरिषदेवर झालेला अन्याय देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आम्ही १५ दिवसांसाठी भाड देखील ठरवून दिल होत. कायमस्वरूपी ही जागा देण्यात आली नव्हती. त्यांना देखील याची कल्पना होती, दुसरी जागा शोधण्यासही सांगितले होत. आम्ही १५ दिवस देऊन दीड महिने त्यांनी जागेचा वापर केला आहे. यापूर्वी देखील तिथे एका कंपनीकडून पैसे न भरल्याचे, पगार न दिल्याचे प्रकार झाले असून उद्या असा प्रकार झाला तर त्याला नगरपरिषद जबाबदार राहिल. त्यामुळे हा ठराव मंजूर केलेला नाही. या जागेत तीन दिवसात त्यांनी कामाला सुरुवात केली. सगळा सेटअप त्यांना दिला होता. मुंबई विद्यापीठासाठी दिलेल्या जागेत सिलिंग तुटण्याचे कारण हे कटींदर प्राणी असून याची दुरुस्ती विद्यापीठ करून घेणार आहे. इथे मुलांना पदवी शिक्षण मिळत असून आमदार दीपक केसरकर यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचा आदर आम्ही ठेवला आहे, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.
तसेच सर्वसाधारण सभेत घनकचरा नियोजन झाले. शहरात नवीन बॉटल क्रशर मशीनही आम्ही लावल्या आहेत. बाटली क्रश होताच चॉकलेट मिळणार असून एक चांगली सवय लोकांना लागावी हा मुद्दा आहे. प्लास्टिक मुक्त सावंतवाडी आम्हाला करायची आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर होऊ नये म्हणून कापडी पिशव्यांचा पर्याय देखील उपलब्ध केला आहे. पाच रूपये मशीनमध्ये टाकताच ती पिशवी मिळणार आहे. पार्किंगच्या विषयात पोलिसांसह आमची बैठक झाली असून त्यावर देखील तोडगा काढण्यासाठी प्रयत्न आहे. तर सांडपाणी व्यवस्थापन व पुर्नवापर प्रकल्पासाठी शासनाकडून नवीन जीआर मिळाला आहे. याबाबत ठराव झालेला असताना पुढील कार्यवाही प्रशासनाकडून का झाली नाही ? याचाही आढावा घेऊ, माझ्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तर शहराच्या सीमांवर पडणारा कचरा बघता शेजारील गावाच्या सरपंचासह आमची बैठक झाली आहे. पुढील गुरूवार पासून शहरात गावठी आठवडा बाजार व राजभाजी महोत्सव घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही नगराध्यक्षांनी घोषित केले.
आरोपांवर पाणी पुरवठा सभापतींचा खुलासा
दरम्यान, ५७ कोटींच्या नळपाणी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहितीच्या अधिकारात नागरिकांनी केल्यानंतर पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांना विचारणा केली असता संबंधित ठेकेदारान चुकीच काम केल्याचे निदर्शनास येताच ते योग्य पद्धतीने करून घेण्याचे आदेश आम्ही दिले होते. डीपीआरनुसार अभ्यास करत काम करून घेण्यासाठी आमचेही दोन महिने गेले. ही योजना सावंतवाडीची मुलभूत गरज असून शहरात जास्तीत जास्त पाणी आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर पाणी पुरवठा योजनेच खडीकरण झाल असून डांबरीकरण अजून शिल्लक आहे. पावसानंतर ते केल जाणार आहे. चुकीचं काम झालंय तिथे योग्य पद्धतीने काम करून देण्यासही आदेश दिलेत. धरणावरून झालेलं काम कोलगाव पर्यंत आलं आहे. जास्त पाणी शहरात आणण्यासाठीच नियोजन झाल असून वरिष्ठांकडून मार्गदर्शन देखील घेतलं गेलं आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा अभियंता देखील आपल्या उपलब्ध होणार असून सध्या पावसामुळे काम बंद आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगलं काम आम्ही करून घेणार आहोत. केसरीवरून, धरणावरून येणार पाणी प्रत्येक प्रभागात देण्यावर आमचा भर आहे. शक्यतो ही योजना देखील गुरुत्वाकर्षणावर चालणारी आहे. या प्रकल्पार पीएमसीच लक्ष असून आमच्या अभियंतांच देखील लक्ष आहे. काम योग्य व्हाव यासाठी आमचा प्रयत्न आहे. यापूर्वी समीतीचा अहवाल देखील आला असून कामावर नगरपरिषदेच लक्ष आहे. काही खासगी जमीनीतून पाण्याची लाईन होती. मात्र, आता त्यांनी बांधकामासाठी परवानगी मागितली असून ती लाईन हलविण्यासाठीची मागणी नगरपरिषदेकडे केली आहे. यासाठी लाईन बाजूला घेतली असून काम पुर्ण झाल्यावर दोन वर्ष देखभाल करण्यासाठीची जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. प्रशासकीय काळात ही योजना आली असून काही निर्णय त्या काळात झाल्याची माहिती श्री. बांदेकर यांनी दिली. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, वीणा जाधव, सुकन्या टोपले आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात घनकचरा मार्गदर्शन
तर, सीमेवरील होणारा कचरा बघता घनकचरा व्यवस्थापनाची जागा व तरतूद शेजारील गावात नसल्याने त्यासाठी आम्ही आवश्यक मार्गदर्शन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करणार आहोत. ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या बघता ग्रामपंचायतकडून जागेसाठी पालकमंत्री व आमदार यांचे लक्ष वेधले जाणार असून या कचऱ्याचे संकलन गावातच कसं करता येईल ? यावर भर दिला जाईल अशी माहिती आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली.










