LIVE UPDATES

कुडाळ शहरात कोट्यवधींच्या विकासकामांचा धडाका

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या विविध कामांचे भूमीपूजन व लोकार्पण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 18:30 PM
views 78  views

कुडाळ : कुडाळ शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विविध विकासकामांचा धडाका उद्या शहरात पाहायला मिळणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते उद्या, गुरुवार दिनांक १८ जून २०२६ रोजी कुडाळ शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळे एकाच दिवशी संपन्न होणार आहेत.

यात शहरासाठी अत्यंत बहुप्रतीक्षित असलेले नाट्यगृह, क्रीडांगणाची संरक्षक भिंत, नवीन उद्यान आणि रस्ता लोकार्पण अशा विविध कामांचा समावेश आहे. या सर्व भव्य कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

सकाळी ११:१५ वाजता कुडाळ येथील कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या 'रंगकर्मी मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाचा' भूमिपूजन सोहळा पार पडेल. या नाट्यगृहामुळे स्थानिक सांस्कृतिक चळवळीला मोठी गती मिळणार आहे. सकाळी ११:३० वाजता खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या व सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तालुका क्रीडांगणाला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होईल.

 दुपारी १२:०० वाजता कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिर्डेवाडी येथे उद्यान विकसित करणे या सुशोभीकरण व पर्यावरणपूरक कामाचा रीतसर शुभारंभ केला जाईल. दुपारी १२:३० वाजता कुडाळ शहरातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला 'देवाची पाणंद रस्ता' लोकार्पण सोहळा पार पडणार असून, हा रस्ता वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी खुला केला जाईल.

 कुडाळ शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या सर्व महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुडाळकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.