LIVE UPDATES

देवगडातील मोकाट गुरांच्या प्रश्नावर नागरिकांचे नगराध्यक्षांना स्मरणपत्र...

३० दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीचा पुनरुच्चार; नगरपंचायत प्रशासनाशी सविस्तर चर्चा
Edited by:
Published on: July 21, 2026 20:03 PM
views 49  views

देवगड : देवगड-जामसंडे शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यांची भेट घेत स्मरणपत्र-१ सादर केले. यापूर्वी आठ दिवसांपूर्वी नागरिकांनी मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून कृती आराखडा नगरपंचायतीकडे सादर केला होता. या आराखड्यानुसार ३० दिवसांच्या आत शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर कृती आराखड्यानुसार नगरपंचायत प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायतीला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष, स्वच्छता व आरोग्य सभापती तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून मूळ मागण्यांची आठवण करून देणारे 'स्मरणपत्र-१' सादर करण्यात आले. शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर ठोस, कालबद्ध आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांनी यावेळी पुन्हा एकदा केली.

यावेळी नागरिकांच्या वतीने गुरुदेव परूळेकर, अण्णा खवळे, विजय कदम, सुधीर मांजरेकर, गिरीश धोपटे, आनंद देवगडकर, महेंद्र लांबोरे, कुंदन घाडी, चंद्रशेखर घाडी, शरद लाड, निलेश ढोके, स्वप्निल कुबल, ओंकार बांदकर आणि विरेंद्र कार्लेकर आदी उपस्थित होते.