LIVE UPDATES

नाधवडे येथील घटनेप्रकरणी कोल्हापूरच्या उद्योजकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

महिलेच्या तक्रारीनंतर वैभववाडी पोलिसांची कारवाई; संशयिताचा शोध सुरू
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 21, 2026 20:36 PM
views 99  views

वैभववाडी : नाधवडे परिसरात घडल्याचा आरोप असलेल्या घटनेप्रकरणी कोल्हापूर येथील एका उद्योजकाविरुद्ध वैभववाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून संशयिताचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित उद्योजकाची नाधवडे येथे ऊसशेती असून देवगड तालुक्यातही आंब्याची बाग आहे. या शेती आणि बागेच्या देखभालीसाठी देवगड तालुक्यातील एका कामगाराची नियुक्ती करण्यात आली होती. या कामगाराच्या पत्नीने संबंधित उद्योजकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित उद्योजकाने २० एप्रिल रोजी तिला जेवणाच्या निमित्ताने घरी बोलावले. त्यानंतर पुन्हा संपर्क साधून २३ एप्रिल रोजी घरी पाहुणे येणार असल्याचे सांगत तिला बोलावले. त्याच दिवशी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे वैभववाडी पोलिसांनी संबंधित उद्योजकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. संशयित हा कोल्हापूरमधील उद्योग क्षेत्रातील परिचित व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वैभववाडी पोलिसांचे पथक संशयिताचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.