वालावल-चेंदवण-कवठी ग्रामस्थांचा संताप

'आमच्या टू-व्हीलरवर बसा आणि प्रवास करून दाखवा!' | अभियंता शिंदेंना धरले धारेवर
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 13, 2026 20:00 PM
views 21  views

कुडाळ : वालावल ते चेंदवण-कवठी रस्त्याची झालेली दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यांविरोधात मंगळवारी ग्रामस्थांचा उद्रेक पाहायला मिळाला. "तुम्ही एसी गाडीतून फिरता, तुम्हाला सर्वसामान्यांचे हाल काय कळणार? आमच्या गाडीवर मागे बसा आणि एकदा कवठीपर्यंत प्रवास करून दाखवा," अशा शब्दांत संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिंदे यांना चांगलेच खडसावले. अखेर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आणि पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलनावर तोडगा निघाला.

रस्त्याची झालीये 'चाळण'; अपघातांची भीती- वालावल ते चेंदवण-कवठी या प्रमुख मार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले असून संपूर्ण रस्त्याची खडी उखडली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून वालावल पोस्ट ऑफिससमोर नेरुर, हुमरमळा, चेंदवण आणि कवठी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

"खड्डे बुजवून केवळ 'थुकपट्टी' लावण्याचे काम करू नका. आमची मुले शाळेत जातात, तरुण नोकरीसाठी याच रस्त्यावरून प्रवास करतात आणि रिक्षाचालक पोटासाठी खस्ता खातात. या खराब रस्त्यामुळे कोणाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण?" असा सवाल बंगे यांनी उपस्थित केला.

आंदोलनाची तीव्रता पाहता निवती पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. परिस्थिती चिघळत असतानाच जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांनी रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता दिनेश बागुल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. केवळ खड्डे न भरता वालावल ते कवठी या संपूर्ण रस्त्यावर 'कार्पेट' मारण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

प्रशासनाकडून आश्वासन- अधीक्षक अभियंता दिनेश बागुल आणि कार्यकारी अभियंता सौ. इंगवले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संपूर्ण रस्त्यावर कार्पेट मारण्यासाठी आवश्यक तरतूद करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून ठोस शब्द मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपला 'रस्ता रोको' मागे घेतला.

आंदोलनात यांचा होता सहभाग- या आंदोलनात जि.प. सदस्य रुपेश पावसकर, अर्चना बंगे, अतुल बंगे, शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, निलेश माधव (उपसरपंच चेंदवण), खडपकर (उपसरपंच कवठी), रुपेश वाड्येकर, अरुण परुळेकर, संदीप नाईक, प्रशांत तेंडुलकर, विजय मेस्त्री, हेमंत वालावलकर यांसह शेकडो युवक, महिला आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.