LIVE UPDATES

रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवघटी विराजमान

भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाचा प्रारंभ
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 11, 2026 21:10 PM
views 8  views

रोहा | रुपेश रटाटे : ऐतिहासिक परंपरेचा वारसा, अढळ श्रद्धा आणि भक्तिभावाचा संगम अनुभवणाऱ्या रोहा शहरात ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या नवरात्रोत्सवाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. ब्रिटिश काळापासून पोलिस मानवंदनेची परंपरा लाभलेल्या देशातील दोन देवस्थानांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या श्री धावीर महाराजांचे विधिवत पूजन करून त्यांना देवघटी बसविण्यात आले. या मंगलमय सोहळ्याने संपूर्ण रोहा शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

रोहा शहराच्या पश्चिमेला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी श्री धावीर महाराजांचे भव्य मंदिर वसले आहे. रायगड जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री धावीर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा, वाघबाप्पा आणि मागील बाजूस तीनवीरा यांची स्थाने आहेत. तर मंदिराबाहेर महाराजांचे अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे. परंपरा आणि श्रद्धेचा हा वारसा आजही तितक्याच भक्तिभावाने जपला जात आहे.

गाऱ्हाण्यातून व्यक्त झाली भक्तांची श्रद्धा!

श्री धावीर महाराजांना विधिवत देवघटी बसविण्याच्या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात रोहेकरांनी मोठी गर्दी केली होती. देवस्थानचे पुजारी वरणकर यांनी देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने महाराजांकडे गाऱ्हाणे मांडले. गावातील सर्व भक्तांनी श्रद्धेने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले असून, उत्सवादरम्यान मानवी हातून काही चुका झाल्यास त्या गोड मानून घ्याव्यात आणि समस्त गावाचे संकटांपासून रक्षण करावे, अशी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली.

यानंतर महाराजांवर अक्षतांची उधळण करण्यात आली. गोंधळ्यांच्या आरत्या, विविध वाद्यांचा गजर आणि घंटानादाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. भक्तांच्या जयघोषात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. धार्मिक विधी, पारंपरिक रूढी आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागातून नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात झाली.

या सोहळ्याला आमदार अनिकेत तटकरे, रोहा नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, विश्वस्त नितीन परब, सुभाष राजे, समीर सकपाळ, विजयराव मोरे, आनंद कुलकर्णी, प्रकाश पवार, महेश सरदार, संदीप सरफळे, राजेंद्र जैन, आप्पा देशमुख, अमित उकडे, निलेश शिर्के, राजेश काफरे, अजित मोरे, रवींद्र चाळके, परशुराम चव्हाण, राजन पाटील, सूर्यकांत कोलाटकर, शैलेश कोळी, प्रकाश पाटणकर, वैभव साळुंखे, काशिनाथ धाटावकर, स्वप्निल धनावडे, प्रफुल्ल पडवळ, भालचंद्र पवार आणि आदित्य कोंडाळकर यांच्यासह विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, उत्सव समितीचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते.