
रत्नागिरी : रत्नागिरी- संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा सक्त इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला. शासकीय विश्रामगृहात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल दाभोळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
भविष्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात जलजीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, महावितरण व पाणी पुरवठा विभागाने समन्वय ठेवून ही कामे पूर्ण करण्यास प्रयत्न करावेत. तसेच जी कामे पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिक अथवा अन्य कोणी अडथळा निर्माण करत असेल त्यांच्याबाबत पोलीस विभागाकडे तक्रार करावी, अशा सूचना डॉ. सामंत यांनी बैठकीत संबंधितांना दिल्या. बैठकीला मतदार संघातील ठेकेदार उपस्थित होते.
या वेळी शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जाणून घेतल्या. यावेळी महाविद्यालयातील स्टाफची कमतरता, प्रशिक्षणाचा अभाव तसेच लॅबमध्ये पुरेसी उपकरणे उपलब्ध नसणे अशा समस्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. या समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. टेक्नीकल फेस्टिव्हल आणि ऑटो एक्सपो सारखी प्रदर्शन भरविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर अकोजवार, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.










