
सिंधुदुर्गनगरी : रविवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. अनेक ठिकाणी वादळसदृश पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नद्या, नाले व ओढे दुथडी भरून वाहू लागले, तर सखल भाग जलमय झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. झाडे उन्मळून घरे, गोठे आणि वीजवाहिन्यांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, देवगड तालुक्यात खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर अनेक भागांत मुसळधार सरींसह वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. सखल भागांत पाणी साचल्याने वाहनांची कोंडी झाली, तर ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला.
वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. ही झाडे घरांवर, गोठ्यांवर आणि वीजवाहिन्यांवर कोसळल्याने मालमत्तेचे नुकसान झाले. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा सुरू केला असून, बाधित नागरिकांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पावसाच्या नोंदीत कणकवली तालुका सर्वाधिक भिजला. कणकवली येथे १८० मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ वैभववाडीमध्ये १२४ मिमी, देवगडमध्ये १०६ मिमी, सावंतवाडीत ९४ मिमी, दोडामार्गमध्ये ७३ मिमी, कुडाळमध्ये ६९ मिमी, मालवणमध्ये ६७ मिमी आणि वेंगुर्ल्यात ४८ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याचा दिवसाचा सरासरी पाऊस ९५.१२ मिमी इतका नोंदविण्यात आला.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आणखी पावसाची शक्यता व्यक्त केल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दरम्यान, देवगड तालुक्यात खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या एका मच्छीमारीसाठी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पावसाळ्यात जलाशय आणि खाड्यांमध्ये मासेमारी करताना अधिक काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी, ओढे आणि पूरस्थिती असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.










