
रुग्ण हक्क सनदबाबतही सजग राहण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक आणि ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असून व्यापाऱ्यांनी ग्राहकांना योग्य दरात वस्तू विकावीत. ग्राहकांनीही आपल्या हक्कांबाबत सजग राहणे गरजेचे आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग ही संस्था व्यापाऱ्यांच्या विरोधात नव्हे, तर अन्यायाच्या विरोधात काम करत असून शोषणमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्राहक चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी केले.
येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विश्वप्रसाद दळवी, संदेश तुळसनकर, तेजस साळुंखे, महेश अन्सारी, राजन वालावलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. पाटील म्हणाले, “ग्राहक पंचायतच्या माध्यमातून ‘जागो ग्राहक जागो’ अभियान राबविले जात आहे. सध्या संस्था राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून ग्राहकांचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. पुणे येथे बिंदुमाधव जोशी यांनी या संस्थेची स्थापना केली. ग्राहकांना एकत्र आणून त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.”
१९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामुळे ग्राहकांना अनेक अधिकार आणि हक्क प्राप्त झाले असून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले आहे. ग्राहक अधिक सजग व्हावा यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘सजग विद्यार्थी ग्राहक अभियान’ राबविले जात आहे. शाळांमध्ये जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती दिली जात असून रॅली, निबंध स्पर्धा आदी उपक्रमांतून जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे. एखादी व्यक्ती उद्योजक असली तरी तिला इतरांकडून वस्तू खरेदी कराव्याच लागतात. त्यामुळे ग्राहकांनी योग्य दर, गुणवत्ता आणि हक्क याबाबत जागरूक राहिले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
वीज तक्रार निवारण मंच आता कुडाळमध्ये
२०१९ च्या कायद्यानुसार अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. पूर्वी रत्नागिरी येथे असलेला वीज तक्रार निवारण मंच आता कुडाळ येथे सुरू झाला आहे. विद्युत महामंडळाशी संबंधित तक्रारींसाठी नागरिकांना येथे न्याय मिळविता येणार असून तीन सदस्यीय न्याय मंच कार्यरत असल्याची माहिती प्रा. पाटील यांनी दिली.
रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक
प्रत्येक दवाखाना व हॉस्पिटलमध्ये रुग्ण ग्राहक हक्कांची सनद लावणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी ही सनद दिसून येत नसल्याचे प्रा. सुरेश पाटील यांनी सांगितले. रुग्णांनीही आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.










