LIVE UPDATES

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कार

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 13:08 PM
views 18  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली :  येथील कणकवली महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाचे माजी विभागप्रमुख, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना पिंपरी-चिंचवड येथील सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, पिंपरी-चिंचवड ही गेल्या ४८ वर्षांपासून कार्यरत असलेली नामांकित संस्था आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव विविध क्षेत्रांत उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी पुरस्कार देऊन या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात येतो. यंदाच्या ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्काराचे मानकरी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर ठरले आहेत. ११ हजार रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड येथे आयोजित भव्य समारंभात प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मुंबरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि वाङ्मयीन चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. अपरान्त  साहित्य कला प्रबोधिनीचे ते जिल्हाध्यक्ष असून फुले-शाहू-आंबेडकर दर्पण प्रबोधिनीचे ,आनंद विकास मंडळ मिठामुंबरी, तालुका देवगड व श्रीवस्तल प्रतिष्ठान,देवरुख, जिल्हा रत्नागिरी चे ज्येष्ठ सल्लागार म्हणूनही ते सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.कणकवली महाविद्यालयातून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक योगदानाची दखल घेत सेवानिवृत्तीनंतर लगेचच सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाने त्यांची ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे तसेच प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.