LIVE UPDATES

सावंतवाडीत तिरंगा यात्रेतून देशाभिमानाचा जागर

मंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 13:49 PM
views 145  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा संस्कार देण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात करण्यात आले. उपरलकर देवस्थान येथून या यात्रेस प्रारंभ झाला. माजी सैनिकांनी या यात्रेच नेतृत्व केल. पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे युवा नेते विशाल परब, जिल्हा संयोजक संदीप गावडे आदींसह देशप्रेमी नागरिक यात सहभागी झाले होते. 

यावेळी भारतमातेचा जयघोष करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. माजी सैनिकांनी या यात्रेचे नेतृत्व केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, तिरंगा आमच्यासाठी अस्मितेचा विषय असून भारतात राहणारा प्रत्येकजण आज  उपस्थित होता. देशाबद्दल गर्व असण आवश्यक असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा होणार आहे. देशाभिमान जागृत करण, वंदे मातरम म्हणणं आवश्यक आहे. जे हे म्हणत नाहीत त्यांना देशावर प्रेम नाही. तर मदरशांसारख्या संस्थांची नोंदणी रद्द केली पाहिजे. 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्यांना  पाकिस्तानात पाठवलं पाहिजे असं विधान श्री. राणेंनी केल. तसेच आमच्यासाठी राष्ट्र प्रथम असून पक्षाचे कार्यकर्ते नंतर पहिली आम्ही भारतीय आहोत हे सांगण्यासाठी एकत्र आलोत असंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रत्येकाला देशाभिमान असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान देशाला दिलं असून महाशक्ती म्हणून जगात आपला उदय होत असताना एकत्र राहिलं पाहिजे, भारत मातेला वंदन केलं पाहिजे. सावंतवाडीची संस्कृती वेगळी असून देशप्रेम, विकासासाठी आम्ही पक्षभेद विसरून एकत्र राहतो अशी भावना माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. 

भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले, भारतमातेला मानणारी लोक एकत्र झाली असून जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आजच्या यात्रेच श्रेय माजी सैनिक, जनतेच आहे. हा कार्यक्रम तिरंग्याचा देशाचा असल्याने राष्ट्र प्रथम मानणारी आम्ही मंडळी आहोत. त्यामुळे सर्वजण यात सहभागी झाले आहेत असं मत श्री. परब यांनी व्यक्त केले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, प्रत्येक मतदारसंघात अशा यात्रा निघणार असून राष्ट्र प्रेमी नागरिकांनी याच नेतृत्व केलं आहे अशी भावना व्यक्त केली. जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी भारताचा अमृत काळ सुरु झाल्यानंतर 'हर घर तिरंगा अभियान'राबवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर राष्ट्रप्रेमी जयघोष करतात ही आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 

हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने सावंतवाडी शहराचा परिसर देशभक्तीत तिरंगामय झाला होता. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप युवा नेते विशाल परब, जिल्हा संयोजक संदीप गावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, युवराज लखमराजे भोंसले, विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, मायकल डिसोजा, महेश सारंग, सुधीर आडीवरेकर, सौ. मोहिनी मडगावकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच माजी सैनिक, देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.